पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा संजय चोरडिया यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त ५९ समाजोपयोगी महिलाप्रधान उपक्रम राबवणार असल्याची घोषणा केली आहे. महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासासाठीच्या या योजना असल्याने होतकरू महिला वर्गासाठी ही आनंदवार्ताच आहे.
महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा पण काहिसा दुर्लक्षित विषय आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्य व स्वच्छताबद्दल जागरूकता व संवर्धनासाठी विविध आरोग्य तपासणी शििबरे जसे की ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर, मधुमेह तपासणी शिबीर, हाडांची घनता तपासणी शिबीर, सांधेदुखी तपासणी शिबीर, ऑस्टियोपॅथी शिबीर, रक्त तपासणी शिबीर आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर शालेय विद्यार्थिनींना वाढत्या वयात होणाऱ्या शारीरिक बदलांची माहिती व गुड टच, बॅड टच याबद्दलची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातील. याबरोबरच अवयव दानाचे महत्व सांगणारे व्याख्यान व त्यासाठी जागरूकता शिबिरे घेतली जाणार आहेत.
महिलांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम, गृहिणींना सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्समध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची संधी, महिलांसाठी ग्रूमिंग व इमेज मेक ओव्हर कार्यशाळा, १० वी, १२वी मध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्यांचा सत्कार, राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनिंचा सत्कार अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. दुर्गम व आदिवासी भागातील वंचित मुलींसाठी सायकल वाटप हा एक महत्वाचा उपक्रम राबवण्यात येईल.
यातून मुलींच्या शिक्षणा बरोबरच आरोग्यसंवर्धनही होईल व पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल. महिलांचे आर्थिक सबलीकरण व उद्योगशीलता वाढावी, यासाठी महिला उद्योजिकांचा सन्मान, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन, स्टार्टअप्ससाठी सहकार्य अशा योजना आहेत.
असे उपक्रम इतरही शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट्स व सामाजिक संस्थांनी राबवले तर देशातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विषमता दूर होण्यासाठी व सर्वांना समान संधी मिळण्यासाठी उपयोग होईल. यातूनच भारत २०३० पर्यंत खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येईल, असे विचार यावेळी प्रा.डॉ. संजय बी. चोरडिया यांनी मांडले.