पुणे : पुण्यातील मिलेनियम इंटरनॅशनल शाळेतील प्रकार अजून तपास कार्यात असतानाच पुण्यातील लैंगिक अत्याचाराचा दुसरा प्रकार समोर आल्याने पुन्हा शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाने शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. कय्यूम अहमद पठाण (वय ३३, रा. विद्यानगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. दोनदा आरोपीने घृणास्पद कृत्य केल्याने मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कोंढवा पोलिसांनी पठाणला अटक केली असून, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.