(Women’s U19 Cricket World Cup) 19 वर्षाखालील महिला टी 20 वर्ल्डकप आयसीसी स्पर्धेत भारताची डोकेदुखी ठरत असलेल्या न्यूझीलंड संघाला एकदाची धूळ चारत फायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. 19 वर्षाखालील महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 107 धावात रोखले होते. हे आव्हान भारताने 14.2 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आता भारताचा अंतिम सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघासोबत होणार आहे.
19 वर्षाखालील महिला क्रिकेट टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने न्यूझीलंडला सुरूवातीपासूनच धक्के दिले. न्यूझीलंडची अवस्था 2 बाद 5 धावा अशी झाली असताना प्लिमेर (35) आणि इसाबेल गाझे (26) यांनी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही जोडी भारताच्या पार्शवी चोप्राने तोडली अन् किवींची फलंदाजी ढेपाळण्यास सुरूवात झाली.
भारताकडून पार्शवी चोप्राने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी टिपले. तिला साधू, अर्चना देवी, शफाली वर्मा आणि मन्नत कश्यप यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेत न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 107 धावात रोखले. न्यूझीलंडचे 107 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने हे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 14.2 षटकात पार केले. भारताकडून सलामीवीर श्वेता शेरावतने धडाकेबाज फलंदाजी करत 45 चेंडूत नाबाद 61 धावा चोपल्या. तर सोम्या तिवारीने 22 धावांचे योगदान दिले. शफाली वर्मा 10 धावा करून बाद झाली.