नवी दिल्ली : केंद्र सरकार देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेसवर काम करत आहे. ज्यामध्ये बॉम्ब स्फोट, दहशतवादासाठी फंडिंग, बनावट चलन, अंमली पदार्थ, हवाला, शस्त्रास्त्रांची तस्करी आदी गुन्ह्यांचा समावेश असणार आहे. हा डेटाबेस केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पोलिसांना वेगवेगळ्यां तपासकार्यात मदत करण्यासाठी महत्वाचा असणार आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात अशी महत्वपूर्ण माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी एनआयएच्या 13 व्या स्थापना दिनानिमित्त बोलताना दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी दहशतवाद मुळापासून संपवणे अत्यंत महत्वाचं आहे. दहशतवाद हा मानवी हक्क उल्लंघनाचा सर्वात मोठा प्रकार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी धोरण आखत आहे” असंही ते म्हणाले.