आनंदनगर : एकीकडे पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी वाहून जावे यासाठी नाले सफाईवर कोट्यवधी रुपये महापालिकेने खर्च केलेले आहेत. दुसरीकडे कायम वाहतूककोंडीत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संतोष हॉल चौकात नाल्यावरील पूल (बॉक्स कल्व्हर्ट) बांधण्याचे काम सुरू केले आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने हे काम करणे सोईचे जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे असले तरी पावसाळ्यात नाल्याचे पाणी वाहून कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंहगड रस्त्यावर ३६ मीटर लांब आणि ६ मीटर रुंदीचे बॉक्स कल्व्हर्ट बांधले जाणार आहेत. पूर्वीचे कल्व्हर्ट तोडून नव्या कल्व्हर्टच्या एका बाजूच्या भिंतीच्या सेंट्रींगचे काम सुरू आहे. या ठिकाणी ६ मीटर रुंदीचे दोन बॉक्स कल्व्हर्ट असणार आहेत. कल्व्हर्टची रुंदी जास्त असली तरी प्रत्यक्षात नाला हा साडेतीन ते चार मीटर इतका रुंदी आहे. त्यामुळे नवे कल्व्हर्ट बांधले तरी नाल्यातील अतिक्रमणांमुळे नाला तुंबण्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तवली आहे.
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधला जाणार आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने वाहतूक पोलिसांनी महापालिकेला कल्व्हर्टचे काम करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे जुने कल्व्हर्ट तोडून नव्याचे काम सुरू झाले. नाल्यातील मैलापाणी वाहून जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली आहे. पावसाळ्यात संततधार पाऊस पडल्यानंतर नाल्याला येणार्या पुराचे पाणी वाहून कसे जाणार, हा प्रश्न यानिमित्ताने व्यक्त होत आहे. खूप पाऊस झाला की, डोकेदुखी वाढणार असल्याची कबुली दिली. यासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च येणार आहे. काम संपेपर्यंत मात्र वाहनचालकांना मन:स्ताप होणार आहे.