जगभरातील बुद्धिबळ प्रेमींचे लक्ष वेधलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेशने इतिहास रचला. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने जगज्जेता डिंग लिरेन याचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाला गवसणी घातली. या विजयासह त्याने विश्वनाथन आनंदच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला. विश्वविजेता बनणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू आहे. ही कामगिरी करणारा विश्वनाथन आनंद हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
डी गुकेशने 13 गेमनंतर चिनी प्रतिस्पर्धी डिंग लिरेन विरुद्ध 6.5-6.5 अशी बरोबरी साधली. 14व्या गेममध्ये डिंग लिरेन पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होता. अशा स्थितीत त्याचा वरचष्मा मानला जात होता. पण डी गुकेशने सर्व अंदाज धुडकावून लावत रोमहर्षक लढतीत बाजी मारली.
अत्यंत चुरशीचा सामना
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाचा सामना बुधवारी १३ वा डाव बरोबरीत सुटला होता. त्यामुळे गुकेश अणि त्यचा प्रतिस्पर्धी जगज्जेता डिंग लिरेन यांचे समान ६.५ गुण झाले होते. अखेरचा पारंपरिक डाव आज (दि. १२) खेळला गेला. डिंग हा पांढर्या मोहर्यांनी खेळणार असल्याचे त्याचे पारडे जड मानले जात होते.चौदाव्या डावात जो कोणी ७.५ गुणांची कमाई करणारा खेळाडू हा जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावतो. गुकेशने ११ व्या डावात ६-५ अशी आघाडी घेतली होती. मात्र डिंग लिरेनने १२ व्या डावात बरोबरी साधण्यात यश मिळवले होते. जागतिक लढतीमध्ये १३ डावानंतरही गुणांची बरोबरी कायम राहिली. तेराव्या डावात ६९ चालींच्या प्रदीर्घ लढ्यानंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचा निर्णय घेतला होता. या अजिंक्यपद स्पर्धेत १३ डावांपैकी ३२ वर्षीय डिंगने पहिला डाव जिंकला तर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ( World Chess Championship 2024)
१८वा जागतिक चॅम्पियन
सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा 18 वर्षीय गुकेश यांच्यात चुरशीची लढत सुरू होती. डिंगने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. अशा परिस्थितीत त्याने गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला होता. तर गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकून या चॅम्पियनशिपमध्ये चॅलेंजर म्हणून प्रवेश केला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील 18 वा खेळाडू ठरला.
गुरुवार 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपची 14वी आणि शेवटची फेरी गुकेश आणि डिंग यांच्यात झाली. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 13 फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते, तर उर्वरित 9 सामने अनिर्णित राहिले होते. अशा स्थितीत दोघांचे समान 6.5 गुण होते त्यामुळे 14 फेरी निर्णायक ठरली. ही फेरीही अनिर्णित राहिली असती तर दोघांचे प्रत्येकी 7 गुण झाले असते आणि त्यानंतर टायब्रेकरने निकाल लावण्यात आला असता. पण भारतीय ग्रँडमास्टर गुकेशने ही वेळ येऊ दिली नाही आणि चिनी ग्रँडमास्टरचा 7.5 विरुद्ध 6.5 अशा फरकाने पराभव केला.