चेन्नई : (World Cup 2023 Pakistan vs Afganistan) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला 23 ऑक्टोबर विसरु द्यायचा नाही, असा कडाडून प्रहार सलग दुसऱ्या वर्षी झाला आहे. गेल्यावर्षी 23 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सामन्यात किंग कोहलीने हॅरिस रौफला मारलेला अफलातून सिक्स हा क्रिकेटच्या इतिहासातील मास्टरस्ट्रोक होता. सोशल मीडियात किंग कोहलीच्या सिक्स व्हिडिओ शेअर करत हॅरिस रौफ आणि पाकिस्तानला ट्रोल करण्यात येत असतानाच आज पुन्हा 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या रहमदुल्लाह गुरबाजने रौफला फोडून काढले.
रौफ गोलंदाजीला आल्यानंतर त्याने पहिल्याच षटकात गुरबाजने चार खणखणीत चौकार ठोकत स्वागत केले. त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध झालेल्या धुलाईची आठवण झाली. आशिया कपमध्ये रोहितकडे पाहून हावभाव करणाऱ्या हॅरिस रौफला याच वर्ल्डकप रोहितने पार हवा काढून घेतल्यानंतर चेहरा पार काळवंडला होता. आज तीच अवस्था गुरबाजने केली. त्यामुळे हंगामा चित्रपटात राजपाल यादवची जेवढी धुलाई झाली नाही, तेवढी धुलाई स्पर्धेत रौफची होत आहे. अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी जबरदस्त फलंदाजी करताना अर्धशतके झळकावली.
तत्पूर्वी, पाकिस्तानने अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 282 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 92 चेंडूत सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय सलामीवीर अब्दुल्ला शफीकने 50 धावांचा टप्पा ओलांडला. अब्दुल्ला शफीकने 75 चेंडूत 58 धावा केल्या. या सलामीवीराने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.