“समाजाने ज्येष्ठांविषयी कृतज्ञता बाळगणे गरजेचे” : खा. गिरीश बापट

पुणे – Girish Bapat : ज्येष्ठ नागरिकांनी समाजाकडून काही मागावे, अशी परिस्थिती न उद्भवता समाजाने ज्येष्ठाविषयी आदर आणि सन्मान राखत वेळप्रसंगानुसार त्यांना मदत केली पाहिजे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

जनसेवा फाउंडेशन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, एल्डर लाईन १४५६७, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम, एस्कॉप, एकता योग ट्रस्ट, पुणे आणि पुणे महानगर परिसर, भारतीय योग संस्थान, नवचैतन्य हास्ययोग परिवार, ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि पुण्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज बालगंधर्व रंगमदिर, पुणे येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक छळवणूक प्रतिबंध जनजागृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. बापट बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रकाश बोरगावकर, अंकुश काकडे, रवींद्र धारिया, उल्हास पवार, डॉ. विनोद शहा, राजेश शहा, अरूण रोडे, दिलीप पवार, स्मितेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाचे प्रधान सचिव, आर. सुब्रह्मण्यम तसेच राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले की, समाजात किंवा कुटुंबात आपली अडचण झाली आहे, ही भावना ज्येष्ठांच्या मनात जागी होणार नाही, असे सकस आणि पोषक वातावरण आपण ज्येष्ठांना देऊ शकलो पाहिजे. मुळात ज्येष्ठ नागरिकांसाठी समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची केवळ प्रभावी अंमलबावणी झाली, तरी ज्येष्ठांच्या निम्म्या समस्या संपुष्टात येतील. व्यक्ती किंवा समाज आजारी पडल्यानंतर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा व्यक्तीच्या आणि समाजाच्या गरजा वेळीच ओळखून त्यावर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.

यावेळी दृकशाव्य प्रणालीव्दारे संवाद साधताना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती असून राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या अनुभवाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांना कधीही असहाय्य किंवा असुरक्षित वाटणे, हे समाजाच्या दृष्टीने अपयशाचे लक्षण आहे.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाचे प्रधान सचिव, आर. सुब्रह्मण्यम यांनी दृकशाव्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ते म्हणाले की, ज्येष्ठांना शारीरिकदृष्ट्या इजा करणे म्हणजे केवळ शोषण नाही, तर त्यांना दुर्लक्षित करणे हेदेखील शोषणाच्याच कक्षेत येते. एक समाज म्हणून ज्येष्ठ नागरिकांविषयी असलेल्या आपल्या जबाबदार्‍यांचे स्मरण करण्याचा हा एक दिवस आहे. मुळात भारतीय कुटुंब व्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रूजलेली असून पाश्चात्य कुटुंब व्यवस्थेच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था हे आपले बलस्थान आहे. हे बलस्थान अधिक सुदृढ आणि सशक्त कसे होईल, या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे.

Dnyaneshwar: