नवी दिल्ली : (World Test Championship Team India) भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने जिंकली अन् 2021-23 टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबल मध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याचे स्थान पाहता भारतीय संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 4-0 किंवा 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.
एवढेच नाही तर भारतीय संघाला गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. दिलासा देणारी बातमी म्हणजे सध्या भारतीय संघ गुणतालिकेत इतर संघांपेक्षा खूप पुढे आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत काही अनुचित घटनाच भारतीय संघाला अंतिम फेरीतून बाहेरचा रस्ता दाखवू शकतात.
सध्या ऑस्ट्रेलियन संघ 13 सामन्यांत नऊ विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. यानंतर भारताचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने 14 सामन्यांत आठ विजय मिळवले आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या, इंग्लंड पाचव्या, वेस्ट इंडिज सहाव्या, पाकिस्तान सातव्या, न्यूझीलंड आठव्या आणि बांगलादेशचा संघ दहाव्या स्थानावर आहे.