XE व्हेरिएंटने केंद्र सरकारची चिंता वाढवली; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात कोरोनाचे रुग्ण पूर्णतः कमी झाल्याचे चित्र असताना संपूर्ण देशभर लोकांना निर्बंधांपासून मुक्ती देण्यात आली होती मात्र काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या XE व्हेरिएंटने केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. याबाबत आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोरोनाच्या XE व्हेरिएंटबाबत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डीआर व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक उपस्थित होते. बैठकीत मांडविया यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना देशभरातील बूस्टर ड्राइव्हला गती देण्यास सांगितले आहे.

याबाबत डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले की, ‘कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आल्यानंतर ‘मॉनिटरिंग आणि सर्विलंन्स सिस्टम’ मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नव्या व्हेरिएंटच्या रूग्णांवर आणि त्यावरील लक्षणांवर निगराणी वाढवण्याच्या सूचनादेखील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत’.

काळजी करण्याची आवश्यकता नाही:
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) चे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी नवीन व्हेरियंटबद्दल बोलताना सांगितले की, “नव्याने आढळून येणाऱ्या व्हेरिएंटच्या आढळून येणाऱ्या रूग्णांमुळे नागरिकांनी लगेच घाबरुन जाऊ नये. कोरोना नवनवीन व्हेरिएंट निर्माण करत असून, यामध्ये XE आणि XE मालिकेतील इतर व्हेरिएंटच्या उपप्रकारांचा समावेश आहे.” परंतु, हे सर्व व्हेरिएंटची लागण होणाऱ्या रूग्णांमध्ये कोणतेही गंभीर लक्षणे आढळून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. सध्या देशात संसर्गाचे प्रमाणही फार वेगाने वाढत नसल्याचे ते म्हणाले.

मुंबईत नुकता कोरोना व्हायरसच्या XE प्रकाराच्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

Dnyaneshwar: