“योगेश कदमचा अपघात नाही तर उद्धव ठाकरेंनीच…”, मुलाच्या अपघातावर रामदास कदमांचे गंभीर आरोप

मुंबई | Yogesh Kadam Accident – शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. या अपघातात योगेश कदम बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान, या प्रकरणी घातपाताची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच याबाबत सखोल तपासाची मागणी देखील रामदास कदमांनी केली आहे.

योगेश कदम यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते. “हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न आहे, असा मला दाट संशय आहे. मी याबाबत पोलिसांशी बोललो आहे. त्यांना यासंदर्भात कसून चौकशी करण्यास सांगितलं आहे. तसंच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीही मी याबाबत आज रात्री बोलणार आहे”, असं रामदास कदम म्हणाले.

“योगेश कदम याला राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी अनिल परबच्या (Anil Parab) खांद्यावर बंदूक ठेवून केला होता. मात्र, त्यांना त्यात यश आलं नाही. म्हणूनच आता त्यांनी त्याला जिवानिशी संपवण्याचा प्रयत्न केला की काय, असा मला संशय आहे. म्हणूनच याबाबत चौकशी होणं आवश्यक आहे”, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे.

Sumitra nalawade: