विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरासह जिल्ह्यात सध्या तरुणाई झिंगत असल्याचे चर्चिले जात आहे. सांस्कृतिक शहर अन् शिक्षणाचे माहेरघर म्हणून बिरुदावली मिरविणारे पुणे अमली पदार्थांच्या विळख्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यासह जिल्ह्यातही या अमली पदार्थांची विक्री उत्पादन अन् पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे भयावह वास्तव आहे.
तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली असून, गरिबांचा गांजा अन् उच्चभ्रूंचे अमली पदार्थ अशी वर्गवारीदेखील यात पडली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे शहर परिसरात एमडी पावडर (मेफेड्रॉन), कोकेन या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन पती-पत्नीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक एकने अटक केली. बाणेर येथे केलेल्या या कारवाईत दोघांकडून तब्बल ९६ लाखांचे मेफेड्रॉन, ३० लाखांचे कोकेन व मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा तब्बल १ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उगुचुकु आणि ऐनीबेली हे पती-पत्नी असून नायजेरियाचे रहिवासी आहेत. २०१८ मध्येदेखील उगुचुकु याच्यावर ड्रग्जविक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाणेर भागात राहत्या घरातून एमडी पावडर, कोकेन अशा अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
नायजेरिया जोडपे जाळ्यात–
पुणे शहर परिसरात एमडी पावडर (मेफ्रेड्रॉन), कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन पती – पत्नीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. बाणेर येथे केलेल्या या कारवाईत दोघांकडून तब्बल ९६ लाखांचे मॅफ्रेड्रॉन, ३० लाखांचे कोकेन व मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा तब्बल १ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या पालकांनी कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. मुला-मुलींचे मित्र-मैत्रीण यांच्याशी असलेली संगत यावरसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. काही शालेय विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत चहा-नाष्ट्याच्या नावाखाली लपून-छपून, बिनधास्त सिगारेट, गुटखा, हुक्का ओढत असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणारी तरुणाई खरेच भरकटत तर नाही ना? असा प्रश्न आता पालकांसमोर उभा ठाकला आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवायांमध्ये सातत्य राहिल्यास बऱ्याच प्रमाणात त्याला अटकाव करता येईल. तर, फक्त पुण्यातील किरकोळ विक्रेते न पकडता त्यांना पुरवठा करणारे म्होरकेदेखील पकडल्यानंतर त्याचा मोठा परिणाम घडू शकेल. पुण्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिस यंत्रणेला कारवाईत सातत्य ठेवावे लागणार आहे. त्यासोबतच गांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी लागणार आहे. पुण्याची ओळख आता आयटी हब अशीही झाली आहे. गुन्हेगारीच्याबाबतीत बोलल्यास पुणेकर आता शांत पुणे आता गुन्हेगारीने बरबटलेले असल्याची चर्चिले जात आहे. त्यासोबतच तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पुण्यातील शिक्षण आणि नोकरीनिमित्त विद्यार्थी, परदेशी नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वर्गाकडे बक्कळ पैसादेखील आहे. पूर्वी गांजा, अफू, चरस या अमली पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. ती आता बदलली असून, त्याची जागा एमडी, केटामाइन, हेरॉइन, एलएसडी स्टँप या महागड्या अमली पदार्थांनी घेतली आहे.
बारा हजार विद्यार्थ्यांना व्यसन परावृत्तीचे धडे–
संयम (सेल्फ अवेअरनेस इन यूथ फॉर अँटी ॲडिक्शन मोटिव्ह) प्रकल्पांतर्गत शहरातील सत्तरहून अधिक शाळांतील बारा हजार विद्यार्थ्यांना व्यसन परावृत्तीचे धडे देण्यात आले आहेत. ताराचंद रामनाथ राठी ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिकेने राबविलेल्या संयम प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनापासून दूर राहण्यासाठी सखोल असे विशेष जाणीव जागृती शिक्षण देण्यात आले आहे. लवळेकर म्हणाल्या की, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संयम प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तयार केलेल्या अभ्यास संशोधन अहवालाचे रविवारी (३१ जुलै) प्रकाशन होणार आहे. मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास महिला आणि बालकल्याण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित राहणार आहेत.
३४ हजार रुपयांचा हुक्का, सिगारेट व गुटखा जप्त-
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या सांगवी व हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी ३४ हजार रुपये किमतीचा हुक्का, सिगारेट व गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने केली आहे. यामध्ये संगवीतील विशालनगरमध्ये असणाऱ्या माऊली पान शॉपवर छापा टाकत समाधान शामराव जाधव (वय ३२, रा. पिंपळे निळख) याला अटक केली असून त्याचा साथीदार नामदेव सर्जेराव शिरोळे (रा. कोथरूड) फरार झाला आहे. या वेळी पोलिसांनी १३ हजार ३५२ रुपयांचा सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. हिंजवडी येथील विनोद व अमित या पान स्टॉलवर कारवाई करीत पोलिसांनी श्रीराम कचरू शेळके (वय २६, रा. हिंजवडी), आशिष तुकाराम हेंडगे (वय २४, रा. वाकड) इर्शाद मोहीन शेख (वय २८, रा. वाकड) यांना अटक केले असून या आरोपींना माल पुरवणारे श्री निवास पाटील ऊर्फ प्रदीप राजपूत व शाम (पूर्ण नाव माहिती नाही) रा. तळेगाव अद्याप ताब्यात नाहीत. या आरोपींकडून पोलिसांनी १७ हजार ६०९ रुपयांचा हुक्का व ३ हजार ४१९ रुपयांची सिगारेट जप्त केली आहे. यावेळी पोलिसांनी ३४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही छाप्यातील आरोपींवर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंजवडी व सांगवी पोलिस करीत आहेत.
गांजा सेवन करणाऱ्या तिघांना अटक–
दापोडी येथे पवना नदीच्या कडेला गांजा सेवन करणाऱ्या तिघांच्या, तर गांजा विक्रीप्रकरणी एका महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर जयवंत खैरनार (वय २७, रा. दापोडी), राकेश सुरेश लाखन (वय ३७, रा. पिंपळे गुरव), संदीप ज्ञानेश्वर नारबेकर (वय ३७, रा. दापोडी) आणि एक महिला (रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक प्रसाद कलाटे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर, राकेश आणि संदीप यांनी आरोपी महिलेकडून गांजा विकत आणला. सोमवारी दुपारी तिघे जण दापोडी येथे एसटी वर्कशॉपच्या भिंतीलगत पवना नदीच्या कडेला गांजा ओढत बसले. याबाबत अमली पदार्थविरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात १९ ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य असा ४९५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
नशेसाठी गोळ्यांची विक्री–
झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (प्रिस्क्रिप्शन) झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) वाघोलीत कारवाई करून एका औषध विक्री दुकानातून सहा हजार गोळ्या जप्त केल्या असून औषध विक्रेत्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली येथील साई अरिहंत जेनेरिकचे महावीर मनसुखलाल देसरडा (वय ३४) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली येथील साई अरिहंत जेनेरिक दुकानात सावंत यांनी तपासणी केली. त्यांना अल्प्रेक्स या औषधाच्या ६ हजार गोळ्यांची अज्ञातांना वाढीव दराने विक्री केल्याचे आढळून आले. बीडमधील न्यू विहान मेडिकलच्या नावे बनावट बिले तयार केली. शासकीय अधिकाऱ्यास बिलाची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करून दिशाभूल केल्याचे सांगण्यात येत आहे. अल्प्रेक्स या गोळ्या स्वस्त असून त्या प्रामुख्याने मानसिक विकार, चिंतेने ग्रासलेल्यांना डॉक्टरांकडून दिल्या जातात. या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असून बेकायदा जादा दराने या गोळ्यांची विक्री केली जात आहे. या गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. शस्त्रक्रियेनंतर झोप येत नसेल तर या गोळ्या दिल्या जातात.
व्यसनाधीनतेमध्ये झालेले बदल–
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी होतात. त्यांचे स्वत:कडेही लक्ष नसते. कपड्यांवरही लक्ष ते देत नाहीत. कैक दिवस ते दाढीदेखील करीत नाहीत.
अंघोळ करणेही टाळतात. त्यांना एकांत पसंत असतो. कुटुंबीय, इतर नातेवाईकांपासून ते दूर राहतात. जुने मित्र सोडून त्यांच्यासारख्याच अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत मैत्री करतात. त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. खेळात, अभ्यासात किंवा तत्सम गोष्टींत उत्तम असलेली ही मुलेही त्यापासून हळूहळू दुरावली जातात. ते चिडखोर होतात.
पुणे टार्गेट का?
मागील काही वर्षांपासून पुणे शहराने आयटी हब, अशी ओळख मिळवली आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून मोठ्या संख्येने तरुणवर्ग नोकरीसाठी पुणे शहरात येत आहे. ग्रामीण भागातही झपाट्याने औद्योगिकीकरण होत असल्यामुळे कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणवर्ग येत असतो. याच तरुणांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढून त्यांना व्यसन लावण्याचे काम तस्करांद्वारे केले जाते.
विक्रीत विदेशी तरुण–
पुणे शहरात अमली पदार्थ विक्रीमध्ये परदेशी आरोपींचा भरणा आहे. नायजेरियामधून आलेल्या तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे परवाच्या कारवायांमधून निष्पन्न झाले आहे.
मादक पदार्थांचे दुष्परिणाम–
मादक पदार्थांचा वापर मानवी समाजात नवीन नाही. प्राचीन काळापासून याचे सेवन चालू आहे. नेहमीच गांजा, चरस, भांग, अफू, धूम्रपान इत्यादींचे सेवन केले जात आहे. आजकाल, हेरॉइन, चरस, कोकेन यांसारख्या औषधांचे प्राबल्य आहे. पूर्वी फक्त श्रीमंतवर्गाला मादक पदार्थांचे व्यसन होते, पण आता मात्र व्यसन सामान्य होत चालले आहे. महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. मादक पदार्थांच्या या नव्या लाटेने जगभरातील सर्व चिंतेत पडले आहेत. मादक पदार्थ हा जीवनाचा शत्रू आहे. ते देवतांनादेखील राक्षस बनवतात, मग मानवाचे काय? काही काळासाठी आनंद देणारी औषधे सतत सेवन केल्याने एखाद्याचे शरीर आणि मन सुस्त होते, दृष्टी क्षीण होते, पचनशक्ती कमी होते आणि हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. यामुळे आरोग्याचा नाश होतो आणि माणूस अकाली मृत्यूचे दार ठोठावतो. अशी व्यक्ती सहानुभूतीस पात्र नाही. सर्व त्याचा तिरस्कार करतात. त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळते.
कुटुंबावरही वाईट परिणाम–
मादक पदार्थांचा – व्यसनी फक्त आपल्या पायावर कुऱ्हाड मारत नाही, तर त्या कारणामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद आणि शांती नाहीशी होते. व्यसनावर पैशांचा अपव्यय केल्याने कुटुंबावर वाईट परिस्थिती येते. घरातील कलह कुटुंबात तणाव आणि संभ्रम वाढवते. दारूच्या बाटलीमुळे अनेक कुटुंबे नष्ट होतात. मादक पदार्थांच्या सेवनामुळे समाजाला नुकसान सहन करावे लागते. समाजात गुन्हे वाढतात. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती धोक्यात येते.