Yuzvendra Chahal On RCB : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणार युझवेंद्र चहलचे संघामध्ये पुनरागमन झालं आहे. तो टी-20 संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. याच फिरकीमुळे त्याने आयपीएलमध्ये देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एका मुलाखातीमध्ये युझवेंद्र चहलने आपलं मन मोकळ केलं आहे. तो म्हणाला की, “मला नक्कीच वाईट वाटलं. माझ्या आयपीएलचा प्रवास 2014 मध्ये आरसीबी संघातून झाला. पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला. मात्र, फ्रेंचायजीकडून 8 वर्षे खेळल्यानंतरही रिटेन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे.”
पुढे बोलताना चहल म्हणाला की, ‘मी आरसीबीसाठी जवळपास 140 सामने खेळलो. मात्र माझ्यासोबत योग्य तो संवाद साधला गेला नाही. त्यांनी मला लिलावात बोली लावण्याचा शब्द दिला होता. मात्र तसं काही झालं नाही. मला खूप राग आला होता. मी आठ वर्षे त्यांच्यासाठी खेळलो, त्यांच्याकडून मला अशी वागणूक मिळाली.’
युझवेंद्र चहल म्हणाला की राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा मला फायदाच झाला आहे. ‘जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. मी राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झाल्यापासून मी डेथ बॉलर झालो आहे. आरसीबीमध्ये मी जास्तीजास्त 16 ते 17 व्या षटकापर्यंत गोलंदाजी करत होतो. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला अशा गोष्टी हाताळता यायला हव्यात. भावनिकदृष्ट्या आरसीबीशी जोडलो गेलो आहे. मात्र राजस्थान रॉयल्सने मला चांगला क्रिकेटपटू बनवलं.’