मुंबई | Akshay Kumar First Look – महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकरताना दिसणार आहे. तसंच त्याचा शिवरायांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक समोर आला आहे.
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये चालत येताना दिसत आहे. तसंच अक्षयने हा व्हिडीओ शेअर करत ‘जय भवानी जय शिवाजी’ असं कॅप्शन दिलं आहे. अक्षयचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या लूकवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अभिनेता अजय देवगणनेही (Ajay Devgan) त्याच्या फर्स्ट लूकवर प्रतिक्रिया दिली आहे.
अजय देवगणनं ट्विटरवर अक्षयचा लूक शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय अक्षय कुमार, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात तुला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ते माझे आवडते मराठा नायक आहेत आणि या महान योद्धांवर आणखी एक चित्रपट बनवला जात असल्याचा मला आनंद आहे’, असं त्यानं लिहिलं आहे.
दरम्यान, अजय देवगणनं ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. विशेष म्हणजे अक्षयचा लूक समोर आल्यानंतर अनेकांनी पुन्हा एकदा शरदच्या भूमिकेची आठवण काढली आहे.