“…याची लाज वाटायला पाहिजे”, ‘ठाणे बंद’वरून राजन विचारेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha – राज्यपाल कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज (17 डिसेंबर) महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचं (Mahavikas Aghadi Mahamorcha) आयोजन करण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्यावतीनं (BJP) पुण्यात ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येत आहे. तसंच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात (Sushama Andhare) शिंदे गटाकडून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खासदार राजन विचारे म्हणाले की, “महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्यानं मिंधे गटाच्या माध्यमातून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या महामोर्च्याला राज्य सरकारनंही परवानगी दिली आहे. अशातच ‘ठाणे बंद’ करण्याचा जो कुटील डाव त्यांनी केला आहे, हा ठाणेकरांचा अपमान आहे. तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया विचारेंनी दिली.

“रात्रीपासून ठाण्यात बसेस बंद करण्यात आल्या आहेत. रिक्षा बंद करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. लोकांना वेठीस धरण्यात येत आहे. अनेक नागरिकांना आज पायी प्रवास करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी दुकानंदेखील बंद करण्यात आली आहेत. तर एकीकडे सरकार आमच्या मोर्च्याला परवानगी देतं आणि दुसरीकडे ठाण्यातील लोकं मोर्च्यात सहभागी होऊ नये म्हणून बसेस बंद करण्यात येतात, हा दुटप्पीपणा आहे. जनता येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल”, असंही राजन विचारे म्हणाले.

Sumitra nalawade: