पाककलेतील पदार्थ प्रपंचात चटणी खाऊन मन काही तृप्त होतच नाही, पण चटणीच्या बाजूलाच असलेली, दिसायला छान अशी कोशिंबीर मात्र… खुणावते. आंबट-गोड कुठल्याही ऋतूमध्ये अगदी आवडीने खाल्ली जाणारी कोशिंबीर… तिचेही केवढे प्रकार आहेत. गाजर, बिटाची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर, बारीक चिरलेला हिरवागार पालक, हिरवी मिरची आणि पनीरचे तुकडे टाकून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.
असे अनेक प्रकार आहेत तिचे गाजर, टोमॅटो, काकडी… सगळं एकत्र करून… त्यावर दही घालून छान मिक्स करून बाऊलमध्ये ठेवून तिच्यावर जेव्हा तडतडणारी जिरे मोहरीची फोडणी आपण देतो, त्यावेळी अशी छान सजलेली कोशिंबीर पाहताक्षणी आपली भूक वाढते, तोंडाला पाणी सुटते हे काही वेगळे सांगायची गरज नाही. तिला बनवण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या… कधी चाकूने बारीक कट केली जाते, तर कधी साल काढून खिसून कोशिंबीर केली जाते. कधी दाण्याचं कुट, तर कधी तीळ-कारळाची पूड कोशिंबिरीची चव वाढवते.
अशा ह्या कोशिंबिरीचे फायदेसुद्धा खूप आहेत… तिच्यामुळे पचनक्रिया सुधारते, त्वचा निरोगी राहते. शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते, तर हाडे बळकट होण्यासाठीसुद्धा कोशिंबिरीची मदत होते. विविध प्रकारच्या भाज्या, फळे वापरून कोशिंबीर बनवलेली असल्यामुळे शरीराला आवश्यक अशी व्हिटॅमिन्स मिळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर अशी ही बहुगुणी कोशिंबीर रुप आणि गुण दोन्हीने परिपूर्ण आणि म्हणूनच तिच्याशिवाय नैवेद्य असो वा रोजचा आहार… अपूर्णच…