राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच नाना पटोले संतापले; म्हणाले, “नऊ वर्षांमध्ये मोदींच्या मित्रांनी…”

मुंबई | Nana Patole – आज (24 मार्च) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी काल (23 मार्च) सुरत न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसंच आज त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर (BJP) सडकून टीका केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे.

“राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींच्या मित्रांनी लाखो-हजारो कोटी रुपये देशातून पळवले आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. आम्ही याचा निषेध करतो आणि मोदी सरकारचा धिक्कार करतो”, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधीनी मोदींच्या आडनावावरुन टीका केली होती. त्यामुळे राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. तसंच काल (23 मार्च) यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र फक्त 30 दिवसांसाठी या शिक्षेची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली. राहुल गांधींना उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टानं 30 दिवसांचा वेळ दिला आहे.

Sumitra nalawade: