श्वेता विनायक |
नैवेद्याच्या ताटातील चटणी, कोशिंबीर, वरण, भाजी हे पदार्थ आपण नुसते तर नाही खाऊ शकत, त्यासाठी लागते ती भात किंवा पोळी. मागील लेखातून आपण भाताचे आहारातील महत्त्व पाहिले. आता आज पोळी आणि तिचे प्रकार पाहूया, पोळीला चपाती असेही म्हटले जाते. हा गव्हापासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे. या पोळीचे अनेक प्रकार आहेत. साधी पोळी, गोड पोळी, मसाला पोळी आणि ह्या पोळ्यांची महाराणी म्हणजे पुरणाची पोळी. जिचा थाट काही औरच.
हरभऱ्याची डाळ शिजवून पुरण यंत्रात तिला वाटून खमंग असा वेलची-जायफळाचा सुगंध आणि साखर यांच्या मिश्रणातून तयार होतं ते पुरण आणि त्याचे सारण जेव्हा पोळीत भरले जाते तेव्हा पुरणपोळी बनते. मोठी प्रक्रिया असल्यामुळेच ती महाराणी म्हणून ओळखली जाते.
पोळी किंवा चपातीला हिंदी भाषेत रोटी असे संबोधतात. पराठा, दशमी, नान, रुमाली रोटी, पुरी हे पोळीचे उपपदार्थ. पोळी बनवण्यासाठी जेव्हा कणिक आपण दुधात भिजवतो आणि ती पोळी जेव्हा तव्यावर दोन्हीकडून तूप लावून खमंग भाजतो त्यावेळी तिचं नाव बदलतं ते म्हणजे दशमी. या पोळीत आपण जेव्हा वेगवेगळ्या पदार्थांचे सारण भरतो तेव्हाही तिची नावे बदलतात जसे की, खवा पोळी, तिळगुळाची पोळी, सांज्याची पोळी. पोळीचे हे प्रकार विशेषतः सणसमारंभातील पदार्थांचे मुख्य आकर्षण ठरतात. गोड पोळी इतकाच पराठाही लोकप्रिय आहे.
आलू, पनीर, चीज किंवा तिखट-मीठ-मसाला तेलात मिसळून घडीच्या पोळीला लावून साधा मसाला पराठा बनवला जातो आणि तो एक चवीष्ट, तसेच पौष्टिक पदार्थ ठरतो. अशी ही पोळी तव्यावर भाजली तर छान फुगते. आतमध्ये गोड असो किंवा तिखट कुठलेही सारण सामावून घेते आणि त्यामुळेच गोल गरगरीत अशी ही पोळी आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे .
कारण तिचा गोल गरगरीत आकार तिच्या आतमध्ये असणारी गोड खमंग चवीची सारणं वरून लागणारे तेल किंवा तूप अशी ही पोळी तव्यावरून जेव्हा जेवणाच्या व्यक्तीच्या ताटात वाढली जाते, त्यावेळी जेवण वाढणाऱ्या आणि जेवणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव येतात. अशी ही बहुगुणी पोळी आणि तिचे विविध प्रकार नैवेद्याच्या ताटात तर हवेतच; पण रोजच्या जीवनातही तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पोळीच्या नंतरचा पदार्थ पाहूया पुढील भागात…