मुंबई | Sanjay Raut On Gajanan Kirtikar – ठाकरे गटाला आता आणखी एक धक्का बसला आहे. खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. काल (11 नोव्हेंबर) संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. “आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते 12 खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकरांनी पक्षाला रामराम ठोकला. दरम्यान, यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किर्तीकरांवर टीका केली आहे.
“किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून त्यांना दोनदा खासदारकी मिळाली. त्याचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत. पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“तुम्ही गेलात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण या पक्षाला कोणताही धक्का नाही. 18 पैकी 13 तिकडे गेले असले तरी काय झालं? त्यांना पुन्हा निवडनूही यायचं आहे ना? त्यांच्यापैकी किती निवडून येतात बघून घेऊ ना”, असंही राऊत म्हणाले.