मणिपूर | आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. दरम्यान, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.
मणिपूर पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास कुकी बंडखोरांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ताफ्यावर बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला असून उपनिरीक्षक एन. सरकार आणि मुख्य शिपाई अरुप सैनी अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात होते.
नेमकं काय घडलं ?
मणिपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, की या बंडखोरांनी सीआरपीएफ चेकपोस्टच्या समोरील पहाडावरून रात्री १२.३० वाजता अंदाधुंद गोळीबार सुरु केला होता. जो मध्ये रात्री २.१५ पर्यंत सुरू होता. यावेळी बंडखोरांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हातगोळेही फेकले. या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला, तर दोन जवान जखमी झाले.
महत्त्वाचे म्हणजे या बंडखोरांनी काही दिवसांपूर्वीच कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ जिल्ह्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपालमध्येही दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या. याशिवाय इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेलमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता.