‘अवतार 2’ पाहताना प्रेक्षकाला आला हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृत्यू

पेड्डापुरम | Avatar 2 – ‘अवतार 2’ (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तब्बल 13 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला भारतातही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे हा चित्रपट धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे मात्र एक दुःखद घटना घडली आहे. ‘अवतार 2’ चित्रपट पाहत असताना एका प्रेक्षकाचं चित्रपटगृहामध्ये निधन झालं आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, आंध्रप्रदेशमधील पेड्डापुरम शहरातील चित्रपटगृहामध्ये लक्ष्मीरेड्डी श्रीनू हे ‘अवतार 2’ पाहण्यासाठी गेले होते. मात्र, हा चित्रपट पाहत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

लक्ष्मीरेड्डी श्रीनू हे त्यांचे भाऊ राजूसह चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट पाहत असताना श्रीनू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच राजू यांनी त्यांना रुग्णालयामध्ये भरती केलं. मात्र, रुग्णालयामध्ये उपचार करण्यापूर्वीच श्रीनू यांचं निधन झालं.

दरम्यान, 2010 मध्ये ‘अवतार’ या चित्रपटाचा पहिला भाग पाहताना तैवानमधील एका 42 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.

Sumitra nalawade: