अग्रलेखमनोरंजनराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

मेरा हमदम मिल गया…

मधुसूदन पतकी

गंमत अशी कुठं जातोय, जाणार हे आपल्या दोघांनाही माहिती नाही. मात्र एक खरं आहे. आपण अपरिचित असलो तरी एकमेकांना ओळखतोय. जीवनसाथी होऊ शकतोय. जसा मला पाहिजे, मनात आहे. अप्रतिम हळव्या शब्दांना तेवढंच हळवं संगीत, सोबत हेमंतदांचा मखमली आवाज.

चित्रपटसृष्टीत काही जोड्या अविस्मरणीय आहेत. काही जोड्यांनी काळ गाजवला. हे लिहितोय त्यात जोड्यांचा उल्लेख केला की, आपल्यासमोर नायक, नायिकाच येतात. त्यानंतर संगीतकारांच्या जोड्या आपल्याला लगेच आठवतात. काही वेळा गीतकार आणि संगीतकार यांची नावं लक्षात येतात. मात्र एखादी जोडी जमायला पाहिजे होती. त्यांनी अनेक गाण्यांची निर्मिती करायला पाहिजे होती, असं वाटतं. त्यातलं मला नेहमी आकर्षित करणार्‍या जोडीचं नाव आहे एस.डी.बर्मन आणि हेमंतकुमार. या जोडीनं काही गाणी केलीत. गायली. अविस्मरणीय केलीत. त्यातलं एक गाणं आहे… न तुम हम जानो… ना हम तुमे जाने… बात एक रातकी… हा चित्रपट, एव्हरग्रीन देव आनंद आणि अभिनयाची अफाट क्षमता असलेली वहिदा रहेमान. मजरुहचे शब्द, हेमंतदांचा खरंतर देव आनंदला सूट न होणारा आवाज. तरी हे गाणं अनेकदा ऐकावंसं वाटतं. गुणगुणलं जातंच.

खरंतर एस.डी. बर्मन संगीतकार. काही चित्रपटांत त्यांनी जी गाणी गायली ती गाणी अविस्मरणीय. संस्मरणीय! तसंच हेमंतदांचं. चित्रपटांना गाणी देताना अनेक चित्रपटांत खूप सुंदर गाण्यांना त्यांनी आवाज दिला. खट्याळ, खेळकर गाण्यांपासून अत्यंत गंभीर, जीवनाचं तत्त्व सांगणार्‍या गाण्यांना त्यांनी आवाज दिला. संगीत दिलं. ही गाणीही अविस्मरणीय. या दोघांची जोडी हे चित्रपटसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्नच. दोघांना संगीताची असलेली जाण. प्रयोगशीलता. गाण्यांसाठी असलेली तळमळ. एकसारखं. त्यातून निघणारं नवनीत सात्त्विकच असणार हे नक्की.

न तुम हमे जानो… या गाण्यात शब्द, संगीताबरोबर अजून एक बाब महत्त्वाची. सुमन कल्याणपूर! तिचा आवाज, लताशी होणारी तुलना, त्यांच्यातली स्पर्धा, सुमनला गुणवत्ता असून, घ्यावी लागलेली माघार, झालेला अन्याय. हा सगळा इतिहास. त्याची सत्यता कोण करणार? मात्र या सगळ्या मुद्यांमुळे सुमन कल्याणपूरची गाण्यातली साद, ती आपलं हृदय हलवल्याशिवाय रहात नाही हेच सत्य.

न तुम हमे जाने… या गाण्यातला मेरा हमदम मिल गया हा विश्वास, आपुलकी, प्रेमाचा निखळ धागा चिरंतन रहाणारा. रहावा असा. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा आपला परिचय नसतो. मुळात आपण त्याला ओळखत नसतो. ती व्यक्ती ही आपल्याबाबत तशीच. अपरिचित. मात्र पहाता क्षणी आत्मीयता, ओढ निर्माण होते. त्या शून्य क्षणाच्या प्रहरात सर्व काही स्तब्ध. निःशब्द. रात्रीचे अस्वस्थ क्षणही शब्दशून्य. अशावेळी ओठांवर जे काही येतं ते तिथंच रहातं. मनात साठतं. शांततेच्या मनात एका हळव्या कथेचा जन्म होतो. ही कथा काळीज कप्प्यातली आणि सांगितली जाते नजरेच्या भाषेने. हे समजायचे झाले तर हमदम होणंच गरजेचं. मजरुहनी हे अगदी अलवार शब्दांत मांडलंय. पुढं महरुह म्हणतात, जीवनातल्या वाटचालीत एका नाजूक वळणावर आपण भेटलो. प्रेमाच्या. इथं केवळ आपणच आपण होतो. सोबत कोणी नाही. हो सोबत आहे ती आपल्या हृदयाची स्पंदनं. त्याचं मोहळ सोबत. पण गंमत अशी कुठं जातोय, जाणार हे आपल्या दोघांनाही माहिती नाही. मात्र एक खरं आहे. आपण अपरिचित असलो तरी एकमेकांना ओळखतोय. जीवनसाथी होऊ शकतोय. जसा मला पाहिजे. मनात आहे. अप्रतिम हळव्या शब्दांना तेवढंच हळवं संगीत. सोबत हेमंतदांचा मखमली आवाज. गाणं किती वेळा ऐकावं याला सीमा नाही.