
पुणे- PUNE CITY NEWS | श्री क्षेत्र पारनेर येथील श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाच्या वतीने आयोजित पूर्णवाद महोत्सवात पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पूर्णवाद वर्धिष्णू प.पू. डॉ. श्री. विष्णुमहाराज पारनेरकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पूर्णवाद तत्त्वज्ञानानुसार माणूस घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण हे पूर्णवादाचे लक्ष्य आहे. मूल्यशिक्षण, परंपरा आणि संस्कृती, भाषा आणि लोकजीवन, ध्यानधारणा, क्रीडा, तत्त्वज्ञान, कार्यसंस्कृती, पर्यावरण आणि निसर्ग इत्यादीचे इत्थंभूत शिक्षण त्यांना अपेक्षित आहे आणि म्हणूनच ‘जीवन ही एक कला आहे’ हा उपदेश आजही समर्पक ठरतो.
आठवडाभर चाललेल्या या महोत्सवामध्ये पूर्णवाद फिल्म फेस्टिवल, भारतीय सिनेमा – एक शिक्षण संस्था या विषयावर परिसंवाद, विविध चित्रपटांचे प्रदर्शन, महाप्रसाद, पारनेरकर गुरुजींचे आशीर्वचन, विविध खेळांचे प्रात्यक्षिक, छत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार, संगीत सभा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. रा. प्र. पारनेरकर स्मृती अक्षरवाङ्मय पुरस्कारही वितरीत करण्यात आले. यावेळी पूर्णवाद महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, गणेश पारनेरकर, सुषमा चोरडिया, गुलजारसिंह राजपूत, राजाराम मुळे, प्रशांत पितालिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘७१ व्या पूर्णवाद महोत्सवात श्री दत्तमूर्ती स्थापनोत्सव व गुरुशिष्य मेळाव्यात मिळालेल्या प्रज्ञावंत पुरस्काराने सद्गदित झालो. आजवर मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचे महत्त्व अधिक आहे. १९९९ साली सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे बीज पेरण्यात आले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सर्वांगीण विकासासाठी अनुकूल, अत्याधुनिक, सर्वसमावेशक शिक्षण सर्वांना प्रदान करणे हा संस्थेचा उद्देश आहे.