“आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा मग…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला
मुंबई | Sanjay Raut On Eknath Shinde – एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. तसंच उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) सरकार जाऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात नवं सरकार राज्यात स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे.
आज (16 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध ठिकाणी भेट देणार आहेत. यामध्ये ते बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या राजगृहला भेट देणार आहेत. त्यानंतर राजभवनवरील रोजगार मेळावा आणि इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमारास एकनाथ शिंदे महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्मारकाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. तसंच संध्याकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन करणार आहेत.
एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी खोचक सल्ला दिला आहे. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातलं खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
3 Comments