ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

टायगर इज बॅक!

मुंबई | Sanjay Raut Bail – शिवसेनेची तोफ असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता रणांगणात उतरले आहेत. तब्बल 100 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्याप्रकरणी ते अटक होते. त्यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्यानं राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांचे प्रत्येकवेळी अर्ज फेटाळण्यात आले होते. तसंच आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या परतण्यानं शिवसेनेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Session Court) विशेष पीएमएलए कोर्टात पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत आणि त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. तसंच याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र ईडीच्या (ED) वकिलांनी कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी देखील केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नसून मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळालयाच हवी असल्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी असून किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तीवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पत्राचाळ घोट्याळाप्रकरणी संजय राऊतांचा हात असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. तसंच राऊतांचे भाऊ प्रविण राऊत डेव्हलपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले असून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरूवातीला समोर आलं होतं ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत आहेत असा दावा ईडीनं केला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये