ताज्या बातम्यारणधुमाळी

“नोटीस पाठवण्याआधी त्यांनी मला एकच सांगावं की…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला खोचक सवाल

मुंबई | Aditya Thackeray On Shinde Government –राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. सोबतच सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. यादरम्यान, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेवरून आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत पार पडलेल्या पक्षाच्या मंथन शिबिरात शिंदे सरकारवर ‘खोके घेतल्याचा आरोप’ असल्याचं म्हटलं होतं. ‘अजूनही कुणी खोके घेतले नसल्याचा दावा केला नाही’, असंही त्या म्हणाल्या होत्या. आरोप चुकीचा असेल तर नोटीस का पाठवली नाही, असा सवाल विरोधकांकडून शिंदे गटाला केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा आक्षेपार्ह पद्धतीनं उल्लेख केल्यानंतर विरोध वाढू लागला आहे. त्यात आता विजय शिवतारेंच्या इशाऱ्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

“बांधावर जाऊन आम्ही पाहणी करत आहोत. दोनदा अतीवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सरकार म्हणून कुणी पुढे आलेलं नाही. कृषीमंत्रीही गायब आहेत. उद्योगमंत्री काय करतायत हेही कुणाला माहिती नाही. कारण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. उद्योग आणि कृषी हे दोन महत्त्वाचे घटक कोलमडताना दिसत आहेत”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते सोलापुरात काही भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खोके म्हटल्यावर शिंदे गटाला एवढं का झोंबतं? खोके म्हणजे नक्की काय? त्यांना हे का झोंबतंय? हेही त्यांनी स्पष्ट करावं. खोके म्हणजे खोके असतात. त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी सांगावं हे आम्हाला, असे खोचक सवालही आदित्य ठाकरेंनी केले आहेत.

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला यांच्या गद्दारीची नोंद घेणाऱ्या 33 देशांनाही याची नोटीस पाठवली पाहिजे. कारण खोके सरकार जगभर प्रसिद्ध झालं आहे. नोटीस द्यायच्या आधी त्यांनी एकच सांगावं की त्यांना हे का झोंबलं आहे. मग त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना सगळं बोलू द्या पण या गद्दार सरकारमध्ये प्रत्येकजण फक्त राजकारणावर लक्ष देत आहे. राज्यातून उद्योग निघून गेले याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. महाराष्ट्र एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी मागे चालला आहे. गद्दार त्यांचं घाणेरडं राजकारण करत आहेत. त्यांना त्यांचं राजकारण करू द्या, आम्ही जनतेची सेवा करत राहू”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये