उद्योजक महेश लोंढे भारताचे प्रतिनिधि
उरुळी कांचन : भारतातील सहावी युवा उद्योजक समीट, तसेच पहिली बायो एनोव्हर्टर समीट गुरुवारी कोलकाता येथील अदमास विद्यापीठात पार पडली. या वेळी भारतातील विविध संशोधक, उद्योजक, विद्यार्थी अशा दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील उरुळी कांचन येथील युवा उद्योजक ॲग्रो झी ऑरगॅनिक यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
कोलकाता अदमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपेंद्र झा यांच्या हस्ते युवा उद्योजक महेश लोंढे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. पुढील संशोधनासाठी त्यांची बर्लिन (जर्मनी) येथे निवड झाली असून, ८ नोव्हेबर रोजी येथे ग्रँड फायनल होणार आहे. तसेच त्यांच्या संशोधनासाठीचा पुढील सर्व खर्च विद्यापीठ करणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली.
महेश लोंढे यांनी एमबीए (ग्रामीण व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च, हैदराबादमध्ये एक वर्षाचा कोर्स केला. ते स्वतः भरडधान्याचे प्रमाणित शेती सल्लागार आहेत, तसेच त्यांनी सहा वर्षांचा कृषी आणि ग्रामीण विकासाचा अनुभव घेतला आहे. महेश यांनी आपल्या अभ्यासातून ‘भरडधान्य हाच एक अमृततुल्य उपाय आहे’ असे शोधले व समाजात याबाबतची जागरूकता करून देणे, या ध्येयाने त्यांनी अग्रो झी कंपनी २०२० मध्ये स्थापन केली.
महेश लोंढे यांनी या समीटमध्ये त्यांच्या ॲग्रो झी या ऑरगॅनिक उद्योगाचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी पारंपरिक पिकांवर प्रक्रिया करून जे लाडू बनविले आहेत, त्यातून कुपोषित, लहान मुले, गरोदर महिला, स्तनदा महिला यांना आयर्न, झिंक, नाचणी सत्त्व यासारखे पोषणमूल्य मिळते या विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे त्यावर एक चांगला पर्याय लोंढे यांनी भरड धान्यांपासून बनविलेली विविध उत्पादने ठरू शकतो असे सुचविले. त्याचाच पुढचा भाग म्हणजे त्यांच्या संशोधन प्रयत्नाला आलेले हे यश.