Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

राजकीय भूकंप! काँग्रेसचे २५ आमदार भाजपच्या वाटेवर

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक राजकीय भूकंप घडविल्यानंतर आता काँग्रेसमध्ये एक महाराजकीय भूकंप घडू पाहत आहे. काँग्रेसमधील पुणे महापालिकेचे निवडणूकप्रमुख असलेले संग्राम थोपटे यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विश्वजित कदम, आ. कल्याणकर यांच्यासह सुमारे २५ आमदारांचा गट भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती ‘राष्ट्रसंचार’च्या हाती आली आहे.

येत्या दिवाळीपर्यंत राज्याच्या राजकारणात मोठे फटाके फुटतील, त्यामध्ये भाजपला मोठे बळ मिळेल असे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेटाळणीमुळे पदरी पडणारी नामुष्की, केंद्रीय काँग्रेसकडून उभी राहत नसलेली लीडरशिप आणि त्यामुळे आलेली मरगळ, तसेच चौकशी व्यवस्थेचा ससेमिरा ही तीन प्रमुख कारणे या आमदारांच्या पक्षबदलाच्या पाठीमागे असल्याचे दिसते.

माजी मंत्री संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तेव्हापासून या छुप्या चर्चेला अधिक बळ मिळत गेले. संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदाकरिता होते. परंतु शरद पवार आणि राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी ते हाणून पाडले, तेव्हापासून ते महाविकास आघाडीमध्ये नाराज होते.

आझादांवर संतापले कार्यकर्ते :

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याअगोदर माजी केंद्रीयमंत्री आनंद शर्मा पक्षात नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पक्षाला असे एकामागोमाग एक धक्के बसत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते अक्षरशः चक्रावले आहेत. काही नेटाने उभे आहेत, काही हताश आहेत. गुलाम नबी आझाद यांना गेल्या ५० वर्षांत काँग्रेस पक्षाने सत्ता दिली, प्रतिष्ठा दिली. केंद्रीयमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रिपद, पक्षाचे सरचिटणीसपद अशी पदे दिली आणि पक्षाच्या अडचणीच्या वेळेस राहुल गांधींच्या नेतृत्वावर ठपका ठेवत आझाद पक्षातून निघून गेले, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.

विश्वजित कदम यांचे सासरे उद्योगपती अविनाश भोसले सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. या चौकशीचे धागेदोरे त्यांची मुलगी आणि पर्यायाने जावई असलेले विश्वजित कदम यांच्यापर्यंत येतात की काय ? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातून संरक्षण मिळण्यासाठी श्री. कदम सध्या भाजपत प्रवेश करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

थोपटेंची पुण्याई :

आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे आणि निवडणूकप्रमुखच भाजपनेत्यांशी बोलणी करीत आहे. मध्यंतरी काँग्रेस भवनात मोडतोडीचा प्रकार झाला. त्या प्रकाराशी थोपटेसमर्थकांची नावे जोडली गेली होती. एवढा प्रकार घडूनही थोपटेंवर निवडणुकीची जबाबदारी दिली. या नेमणुकीबद्दल नाराजी होती. परंतु, थोपटे यांचे ज्येष्ठत्व आणि त्यांचे वडील अनंतराव यांच्याविषयी आदर असल्याने संग्राम थोपटे यांच्याविषयी तक्रारीचा जाहीर सूर उमटला नाही.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सध्या भाजपचे लक्ष्य असून त्या दोन्ही ठिकाणची मोठी राजकीय घराणी आता भाजपच्या दावणीला बांधली जातील, असा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे दिसते. यामध्ये अशोक चव्हाण एक मोठे नाव घेतले जात आहे. त्यांच्यादेखील चौकशा आणि काँग्रेसमध्ये त्यांची होत असलेली परवड पाहता तेदेखील भाजपच्या वाटेवर येऊ शकतात, अशी अटकळ बांधल्यानंतर भाजपने त्यांच्याशी संपर्क साधणे सुरू केले होते.

भाजप मराठवाड्यातील लातूरस्थित एका बड्या घराण्याच्या संपर्कात आहे. परंतु काँग्रेसमधील परंपरा आणि एकूणच पक्षनिष्ठेबाबतचा इतिहास पाहता भाजपसारख्या पक्षात आपण जाणे हे जनतेला रुचणार नाही, या भीतीने हे घराणे सध्या निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नाही. परंतु भाजपच्या वतीने त्यांनी पक्षात यावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे समजते.
ना. एकनाथ शिंदे, ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या नव्या सरकारच्या माध्यमातून ही आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी विधानसभेत आमचे २०० आमदार असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. ते सदस्य अशा पद्धतीच्या एकत्रीकरणातून जमविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

काँग्रेसच्या पक्ष बदलाबाबत हे घडले, तर महाराष्ट्रात काँग्रेसची प्रचंड मानहानी होऊ शकते आणि पुढील वाटचाल काँग्रेसकरिता अत्यंत वेदनादायक ठरू शकते. राज्यभरात मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राहतील. शिवसेना खिळखिळी केल्याने ती मर्यादित ठेवणे शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा ठरावीक समाजाचा अजेंडा घेऊन जाणारा पक्ष असल्याने तोदेखील मर्यादित अस्तित्व राखून ठेवेल आणि भाजपला प्रदीर्घ सत्तेची संधी मिळेल, असा अंदाज भाजपच्या गोटात बांधला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये