“सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं हाच भाजपचा…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

मुंबई | Uddhav Thackeray On BJP – आज (17 नोव्हेंबर) शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून आता राजकीय वातापरण तापलं असून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. तसंच त्यांनी शिंदे गटावरही टीका केली.
“शिवसेनाप्रमुख म्हणजे संघर्ष हा आलाच. अन्यायाविरूद्धचा लढा आलाच. मला हा स्मृतीदिन वेगळा वाटतोय कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर ते कोण होते हे समजायला 10 वर्ष लागली. आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा उमाळा त्यांचा बाहेर आला आहे. अनेक शिवसेनाप्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करायला हरकत नाही. पण, ते करताना याचा कुठे बाजारा होऊ देऊ नये, ही माझी नम्र भावना आहे. तसंच विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कारण कृती नसेल तर तो विचार राहत नाही त्याला बाजारूपणा येतो. त्यामुळं शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कुणी मांडू नये, विचारांना साजेसं असंच काम करावं एवढीच विनंती आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनाप्रमुखांचं स्मारक राज्य सरकारनं ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. “बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या वैयक्तिक कुटुंबाचं नाही. ते स्मारक महाराष्ट्राचा स्वाभिमान व्हावं यासाठी राज्य सरकारनं ते ताब्यात घेऊन त्याची नीट देखभाल करावी. स्मारकाच्या देखभालीसाठी एखादी समिती स्थापन करून ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची तिथे नेमणूक करावी”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“भाजपला सगळ्याचाच ताबा हवा आहे. तो द्यायचा की नाही हे देशातल्या जनतेनं ठरवायचंय. सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं हाच भाजपचा मनसुबा आहे. देशात लोकशाही आहे. स्वप्न बघणं हा लोकशाहीतला अधिकार आहे. त्यांनी ती जरूर बघावीत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
One Comment