ताज्या बातम्यारणधुमाळी

“बाळासाहेबांच्या नावानं जे तोतये निर्माण होत आहेत ते…”, राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

मुंबई | Sanjay Raut On Shinde Group – आज (17 नोव्हेंबर) शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून आता राजकीय वातापरण तापलं असून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली. तसंच राहुल गांधीनी (Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेवरून सुरू असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “वीर सावरकरांनंतरचे एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत हे रोज आम्हाला सांगण्याची गरज नाही. वीर सावरकरांना भारतरत्न द्या ना? आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत. हिंदुहृदयसम्राटांविषयी एवढंच प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही सावरकरांच्या बरोबरीनं भारतरत्न मिळायला हवा. अनेक राजकीय नेत्यांना स्वार्थासाठी भारतरत्न किताब देण्यात आला आहे. पण बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांना भारतरत्न किताब का देण्यात आला नाही?”, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. सावरकरांवर ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या ही शिवसेनेची मागणी आहे. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही ही मागणी करत आहोत”, असंही राऊत म्हणाले.

“आज आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनाच प्राधान्य देऊन पुढे जात आहोत. कुणी काहीही सांगितलं, कितीही टीका केली तरी बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्यात हातात असू शकते. शिवसेनाप्रमुखांना जाऊन 10 वर्षं झाली आहेत. त्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झाला. ज्या पद्धतीनं बाळासाहेब आमचे, त्यांचे विचार आमचे असं म्हणत आहेत हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला आहे. ढोंगाला लाथ मारली पाहिजे असं ते म्हणालेत. दुर्दैवानं आज महाराष्ट्रात काही ढोंगी लोकं आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र ती जनता पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच निष्ठावान आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब जर असते आणि अशा प्रकारचे कंबरेखालचे घाव झाले असते तर बाळासाहेबांनी त्यांची अवस्था फार वाईट करून ठेवली असती. बाळासाहेबांचे फटकारे, भूमिका, विचार यामुळे महाराष्ट्राला मजबुती मिळाली आहे. बाळासाहेबांकडे पाहिलं की आजही वाटतं राज्याचं नेतृत्व किती खुंज झालं आहे. बाळासाहेबांच्या नावानं जे तोतये निर्माण होत आहेत ते फार काळ टिकणार नाहीत”, असंही राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये