मुंबई | Sanjana Ghadi On Narayan Rane – शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. जर नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीनच बिघडून जाईल. कारण ते कधी काँग्रेस, कधी भाजप तर कधी शिवसेनेला शिव्या घालत असतात, अशी मिश्कील टिपण्णी संजना घाडी यांनी केली आहे. आज (22 डिसेंबर) दिशा सालियान मृत्यू प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजना घाडींनी नारायण राणेंवर खोचक टीका केली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
संजना घाडी म्हणाल्या की, आधी नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांच्या बायका का टिकत नव्हत्या? यांच्या घरातले टीव्ही का फुटत होते? सिंधुदुर्गातल्या घराघरात हे माहिती आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर ती मशीनच बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी भाजपला तर कधी शिवसेनेला शिव्या घालतात, कुठला पक्ष ठेवलाय का तुम्ही?, असा प्रश्न संजना घाडींनी विचारला.
पुढे संजना घाडींनी राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश असल्याचा आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळेंनी लोकसभेत बोलताना केला होता. यावर बोलताना संजना घाडींनी शेवाळेंवर सडकून टीका केली.
राहुल शेवाळे स्वतःच्या धर्मपत्नीबरोबरही वचनं निभावू शकले नाहीत. ती महिला अशी भळभळती जखम घेऊन तुझ्याबरोबर राहतेय. तुला ज्या मतदारांनी शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून दिलं, ज्या शिवसैनिकानं आपल्या रक्ताचं पाणी केलं त्यांना तू विसरलास. मुळात तुझा स्वभाव गद्दारीचा, विश्वासघातकी आहे. अशा या लोकप्रतिनिधीवर लोकांनीही विश्वास ठेवू नये. महिलांनी अशा या खासदारापासून लांब राहावं, अशी टीका संजना घाडी यांनी केली.