प्रारब्ध म्हणजे नेमके काय…?

भारतीय तत्त्वविचारानुसार या संचितात मनुष्याची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली असतात. संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते. यातील काही भोग आनंददायी, तर काही दुःखद असतात. त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात.
मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो. त्या सर्व कर्मांचे परिणाम हळूहळू साठत जातात. ज्याप्रमाणे दरमहा ठरावीक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहाते व खात्याचा बॅलन्स वाढत जातो, अगदी तसेच मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात. कर्मफलाच्या खात्यातील या बॅलन्सला संचित असे म्हणतात. मनुष्य जसजसे कर्म करीत जातो तसतसे त्या कर्मफलांचे रूपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलन्स वाढत जातो.
भारतीय तत्त्वविचारानुसार या संचितात मनुष्याची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली असतात. संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते. यातील काही भोग आनंददायी, तर काही दुःखद असतात. त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात. संचितांपैकी ज्या कर्मांचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास प्रारब्ध असे म्हणतात. संचित म्हणजे कर्मफलांचा महासागर आहे, तर प्रारब्ध म्हणजे किनार्यावर येणार्या लाटा. अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनार्यावर प्रकट होते त्याला आपण लाटा म्हणतो. त्याप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात त्यास प्रारब्ध म्हणतात.
कर्माचे काही परिणाम असे असतात की, ते तत्क्षणीच भोगावे लागतात. त्यास क्रियमाण असे म्हणतात.
उदाहरणार्थ, तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भाजतो. केलेल्या कर्माचे फल तिथल्या तिथे भोगावे लागते. हे झाले क्रियमाण. यासोबतच संचिताच्या पेढीतील ज्या कर्मफलांचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमानकाळी भोगत असतो त्याचाही समावेश क्रियमाणात होतो. संचित म्हणजे महासागर, प्रारब्ध म्हणजे लाटा व क्रियमाण म्हणजे किनार्यावर उभ्या असणार्या मनुष्याच्या पायाला त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी.
थोडक्यात संचित म्हणजे कर्मांचा भूतकाळ, प्रारब्ध म्हणजे वर्तमानकाळ, तर क्रियमाण म्हणजे चालू वर्तमानकाळ. मर्सिडीजमध्ये मालकिणीच्या मांडीवर बसून तुच्छतेने बाहेरच्या जगाकडे पाहणारा टॉमी, तर याउलट गल्लीबोळात भुंकून भुंकून हाडांचा सापळा झालेला स्ट्रीट डॉग आता दोन्हीही तसं म्हणाल तर श्वानच; पण एक मर्सिडीजमध्ये, तर एक रस्त्यावर याला प्रारब्ध नाही तर काय म्हणणार? निसर्गाच्या नंदनवनात स्वच्छंद विहार करणारे पोपटांचे थवे, तर त्यांच्यातले काही जन्मापासूनच पिंजर्यात जीवन कंठणारे याला प्रारब्धच म्हणतात.