सर्वधर्मसमभावाचे दर्शन…
मुंढवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कामगार सेल यांनी मुंढवा,केशवनगर ,घोरपडी ,कोरेगाव पार्क या भागातील मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार, नमाज अदा असे कार्यक्रम कामगार मैदानातील गणेश व संत रोहिदास महाराज यांच्या मंदिराच्या आवारात घेण्यात आला. तसेच मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणेश आरती ही करण्यात आली .या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस सोमनाथ शिंदे यांनी केले.
तसेच शिक्षण महर्षी पी.ए. इनामदार यांच्या हस्ते, श्री गणेशाची आरती करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. श्रीराम या घोषणेबरोबरच अल्लाहू अकबर च्या एकत्रीत घोषणा देण्यात आल्या. आम्ही सर्व एक असल्याचीही खात्री देण्यात आली. त्यावेळी सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या ठिकाणी पहायला मिळाले. तेथे झालेल्या कार्यक्रमानंतर पी.ए. इनामदार यांनी सर्व-धर्मीय कार्यक्रम घेणे समाजासाठी आवश्यक असल्याचं म्हटलं तर ऍड. सरोदे म्हणाले की, सध्या समाजामध्ये धर्मा-धर्मा मध्ये विष पेरण्याचे काम करणार्यांना दूर करण्याचे काम आपण सर्वांनी एकत्र मिळून केले पाहिजे. तसेच अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष इक्बाल शेख यांनी हिंदू समाजाने मुस्लिम समुदायासाठी केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुकही केले आंणि सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्षतेचे येथे दर्शन घडले अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेविका पुजा कोद्रे, ऍड. इकबाल शेख, फहीम शेख, आसीम सरोदे, सलीम मेमन, युनूस शेख, राजू अग्रवाल, संदीप कोद्रे, नूरखान,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, विक्रम लोणकर, सोमनाथ गायकवाड, विजय दरेकर, दादा कोद्रे, रमेश राऊत, आक्रम खान, नुरखान व ग्रामस्थ व मुस्लीम बांधव उपस्थित होते.