ताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

निवडणुकीच्या कामासाठी पिंपरी चिंचवड पालिकेचे तब्बल ३ हजार ९६२ अधिकारी-कर्मचारी तैनात

विधानसभा निवडणूक कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील तीन हजार ९६२ अधिकारी, कर्मचारी निवडणूक विभागाकडे वर्ग केले आहेत. त्यात वर्ग दोन व तीनच्या अधिकाऱ्यांची संख्या दोन हजार ३५२ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ६१० इतकी आहे. शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी विधानसभा मतदारसंघांसह जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत निवडणूक कामकाजाच्या वेगवेगळ्या विभागात त्यांची नियुक्ती केली आहे. पालिकेतील कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे याचा परिणाम पालिकेच्या कामावर होताना दिसून येत आहे.


निवडणूक विषयक कामकाजासाठी शिक्षकांसह महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पंचायती, नगर परिषदा, महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील वर्ग दोन व तीनचे अधिकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह शाळांच्या शिक्षकांचीही नियुक्ती केली आहे. यामध्ये महापालिका मुख्यालयातील विविध विभागांसह आठही क्षेत्रीय कार्यालये व करसंकलन कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे, महापालिकेत सध्या शुकशुकाट असून कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे कामकाज सुरू आहे.

अशी आहे नियुक्ती
राष्ट्रीय माहिती कक्षाकडे (एनआयसी) महापालिका सेवेतील वर्ग दोन व तीनचे दोन हजार ३५२ अधिकारी आणि एक हजार ६१० कर्मचारी दिले आहेत. त्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ६९४, पिंपरीसाठी एक हजार ४९ आणि भोसरीसाठी ६०९ वर्ग दोन व तीनच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील काही जण चिंचवड, पिंपरी, भोसरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) कक्षात नियुक्त केले असून काहींकडे सेक्टर ऑफिसरची जबाबदारी आहे. काही जण राष्ट्रीय सूचना केंद्रासह कॉम्प्युटर ऑपरेटर, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी नियुक्त केले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय
महापालिकेतील नियुक्त ‘संख्याबळ’
मतदारसंघ / सेक्टर ऑफिसर / निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष/ अधिकारी, कर्मचारी
चिंचवड / ७८ / ३६८ / ४४६
पिंपरी / ५१ / ३१९ / ३७०
भोसरी / ५६ / ३४३ / ३९९
एकूण / १८५ / १०३० / १२१५

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये