मुंबई पालिका रुग्णालयांतील परिचारिकांचे वेतन थकले; चार महिन्यांपासून उधारीवर उदरनिर्वाह

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या ६०० नर्सेसना गेल्या चार महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे नर्सेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. कामगार संघटनांनी याकडे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे लक्ष वेधले असून तातडीने वेतन देण्याची मागणीही केली आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील नर्सेसची कमतरता लक्षात घेऊन, चार महिन्यांपूर्वी तब्बल ६०० नर्सेसची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई महापालिकेची नोकरी मिळाल्यामुळे या नर्सेस आनंदी होत्या. पण पहिल्याच महिन्याचा पगार थकल्यामुळे त्यांची चलबिचल झाली. त्यानंतर सलग चार महिने त्यांना पगारच मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पगाराविना आम्ही किती दिवस राहणार, असा सवाल आता नर्सेसनी केला आहे. तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत पगार नाकारला जात आहे. महापालिका आणखी किती दिवस असे करणार, पगार नसल्यामुळे रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी होणारा वाहतूक खर्च, घरातील खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न या नर्सेसना पडला आहे.
रुग्णालयांमध्ये तीन पाळ्यांमध्ये रुग्णसेवा करूनही तब्बल चार महिने पगार देण्यात न आल्यामुळे नर्सेसनी रुग्णालया प्रशासनाकडे अनेकदा विचारणा केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी थेट कामगार संघटनांकडे धाव घेतली. नर्सेसच्या पगाराला होणाऱ्या विलंबाकडे महानगर आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे लक्ष वेधले आहे.
कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा
प्रत्येक महिन्याला पगार मिळणे बंधनकारक आहे. पण महापालिकेच्या आरोग्य विभागातील ढिसाळ कारभारामुळे या नर्सेसना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. लवकरात लवकर पगाराचा निर्णय घेऊन तो पगार नर्सेसच्या बँक खात्यात जमा झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कामगार संघटनांकडून देण्यात आला आहे.