ताज्या बातम्यापुणे

७७ वर्षीय ‘तरुणाने दिला तंदुरुस्तीचा संदेश; केवळ ७ दिवसात केला बारामती ते बेळगाव सायकल प्रवास

सलग ७ दिवस बारामती ते बेळगाव हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून बारामती येथील ७७ वर्षीय ईश्वर कदम या ‘तरुणा’ने युवकांसमोर आगळावेगळा आदर्श उभा केला आहे. या सायकल प्रवासातुन त्यांनी ‘सायकल चालवा, तंदुरुस्त राहा’ असा संदेश दिला आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालेले ईश्वर कदम यांनी नुकताच हा प्रवास पूर्ण केला आहे.

वाहनांची वाढलेली संख्या आणि अतिवेग यांचा विचार करून कदम यांनी महामार्गांचा वापर टाळून बारामती ते बेळगाव हा सायकल प्रवास पूर्ण केला. बारामती ते बेळगाव सोलो सायकलिंग करणारे कदम हे बारामतीतील पहिले सेवानिवृत्त अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी त्यांनी विजापूर, विटा, सांगली, खंडाळा, फलटण, वाई, मेढा, कोरेगाव, गोंदवले, ब्रम्हपुरी असा तब्बल २ हजार किमीचा सायकल प्रवास केला आहे.कदम हे रोज सकाळी सहाच्या सुमारास सायकल प्रवासाला सुरुवात करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवास करत असत. प्रवासादरम्यान दुपारी एक तास ते विश्रांती घेत असत.

कदम हे दररोज ३५ ते ४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत असत. यामुळे एकूण अंतर पार पाडण्यासाठी मदत झाली. दरम्यान हिवाळ्याचे दिवस व त्यात भर म्हणून ढगाळ वातावरणामुळे पहाटे दाट धुके व उशिरा होणारे सुर्यनारायणाचे दर्शन वगळता प्रवासात इतर कोणतीच अडचण आली नसल्याचा अनुभव त्यांना यावेळी आला. प्रवासादरम्यान त्यांनी लॉजिंग – बोर्डिंगला बगल देत वेगवेगळ्या गावांतील मंदिरे, शाळा, आश्रम व मठ यांचा आश्रय घेऊन मुक्काम केला.

सायकलप्रवास करत असताना कदम यांनी फक्त शाकाहार घेतला. शीतपेये, बाटलीबंद पाणी याला वर्ज्य करण्यात त्यांना यश आले. शहाळे, उसाचा रस यासह स्थानिक पदार्थांचा व पाण्याचा उपयोग त्यांनी केला. या प्रवासाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली व कर्नाटकातील बेळगांव या ४ जिल्ह्यातून प्रवास केला. हा प्रवास करताना त्यांच्या सायकलमध्ये व तब्बेतीत काहीही बिघाड झाला नाही.योग्य आहार, दररोजचा सराव, दृढनिश्चय आणि धाडस या गोष्टींमुळेच एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करू शकल्याचे मत यावेळी ईश्वर कदम यांनी व्यक्त केले. त्यांच्या या धाडसी प्रवासाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये