शाळेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! पुण्यातील ६१ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा

महाळुंगे / राजगुरुनगर : राजगुरूनगर शहरातील हुतात्मा राजगुरू विद्यालयातील ६१ विद्यार्थ्यांना पोषण आहारातील भात पदार्थातून विषबाधा होऊन मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून सर्व विद्यार्थ्यांना २४ तास डाँक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे.
घटना घडताच खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे,पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे आदींनी रुग्णलयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्बेतीची विचारपूस करीत योग्य व तातडीने उपचार करण्याच्या सुचना रुग्णालयाच्या संबंधित वैदयकीय अधीक्षकांना दिल्या आहेत.
राजगुरूनगर शहरात भीमा नदीवरील नवीन पुलाजवळ हुतात्मा राजगुरू विद्यालय आहे.पाचवी ते आठवीतील २८१ विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार दिला जातो. गुरुवारी (दि.९) दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला. आहार खाल्यानंतर अर्ध्या तासाने विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांना मळमळ व पोट दुखत असल्याचा त्रास सुरू झाला.विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक नगरकर यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांवर लगेच उपचार केले.
“मळमळ व पोटदुकीचा त्रास झालेल्या सर्व विद्यार्थ्याची तब्बेत ठीक असून त्यांना २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.“
महेंद्र गरड – वैद्यकीय अधीक्षक चांडोली ग्रामीण रुग्णालय
“संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.“
राजकुमार केंद्रे – पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन
मुलांना विषबाधा झाल्याची घटना समजताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यालयासह रुग्णालयात धाव घेतली.यावेळी मोठा गोंधळ झाला.परंतु मुलांना अजिबात धोका नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यावर पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. तात्काळ व योग्य उपचार तातडीने करण्याच्या सूचना भेट दिलेल्या अधिकाऱ्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या आहेत.