तेरी हुई जीत रे…

ओपींनी दिलेलं अप्रतिम संगीत, नितांतसुंदर स्वरावली. गाणं संगीतासह मनात ऐकू येत राहतं. शामाचा अभिनय, गुरुदत्तचा अडगेपणा. जीवन चालणारं, न थांबणारं. त्यात हे असे प्रसंग नातेसंबंधात गोडवा निर्माण करणारे. मग पडती बाजू घेतली तर काय बिघडणार हो…!
मधुसूदन पतकी
हिंदी चित्रपटात लटक्या रागाची गाणी अनेक. नायक रागावलेला असतो किंवा नायिका चिडलेली. कोणी तरी कोणाची समजूत काढत. हिंदीत मनवतं. रागा-लोभाची अनबन आणि अखेर गोड. फार सुंदर. अप्रतिम ही गाणी वळिवाच्या पहिल्या सरीनंतर येणार्या मातीच्या सुंदर सुगंधासारखी. मन भरतं त्या गन्धानी पण साठवता येत नाही. कुपीत भरून ठेवता येत नाही. पण मनातून तो गंध जात नाही. तसंच काहीसं. गीता दत्त. तुलनेने कमी गाणी; पण अफाट रेन्जनी गायलेली. गाणी निवडणं अवघड. गाण्याच्या प्रेमात पडावं आणि रमून जावं. असंच एक मखमली, नाजूक, लडिवाळ, गुलाबी छटा असलेल गाणं. ये लो मैं हारी पिया…! हे गाणं नापसंत करणारा केवळ अशक्यच.
गुरु दत्तचा आरपार चित्रपट. निर्माता, दिग्दर्शक तोच. अब्रार अलवीचे संवाद आणि मजरुह सुल्तानपुरींची गाणी. या सगळ्यावर नशा आणणारे ओ. पी. नय्यर यांचं संगीत. गुरु दत्त आणि ओ. पी. यांचा दोस्ताना आणि काळाच्या पुढे पाहणारं गुरूचं दिगदर्शन. हे सगळं चढत्या क्रमानी गुरूच्या अभिनय, विषय, त्याची मांडणी, वेगवेगळे प्रयोग यातून दिसत गेलं. गीताचा आवाज हे आजच्या भाषेत अॅड ऑन फुटेज होतं. हे गाणं गोड आहेच. पण मला या काळातली गाणी पाहणं अधिक आवडतं याचं कारण त्यावेळची महानगर, माणसं, त्यांचे पोषाख, वाहनं पाहणं अधिक मजेचं असतं. या सगळ्याचा परिणाम गाण्यावर होत असतो. ये लो मैं… आरपारमधलं असंच गाणं. नायक टॅक्सीचालक असल्यानी गावांचं चित्रण अपरिहार्य. त्यात श्यामा ही नायिका ज्या लटक्या रागाने गाणं म्हणते तो सगळा भाग पुन्हा पुन्हा पाहावा असा. खरं तर ती जिंकलेली आहे. पण त्याच्यासाठी माघार घेत पराभव मान्य करते. नव्याने प्रेमात पडतोय तर भांडण कशाला असा तिचा सरळ साधा विचार.
आता कुठे आपण ओळखायला लागलो. नजरेचा बाण हृदयाचा वेध घेतोय. अगदी आता आता आणि तुझा हा रुसवा. चल मी माफ केलं कारण नवं प्रेम आणि मी हरलेली तुझ्या प्रेमात. हे बघ माझं नशीब आता तुझ्यासोबतच चालतंय. माझा हात तुझ्या हातात आणि मी केवळ तुझ्यासोबत आणि तू भांडतोस, अरे यात सोनेरी दिवस संपून जातील… माझी स्वप्नं तू लुटू नकोस. माझं नाजूक हृदय भंग करू नकोस. आता मी खरंच (हे पण खोटं खोटंच बरं का) तुला शिव्याशाप देईन, कारण मी तुझ्या प्रेमात पडले आणि हरले आहे. ओपींनी दिलेलं अप्रतिम संगीत, नितांतसुंदर स्वरावली. गाणं संगीतासह मनात ऐकू येत राहतं. शामाचा अभिनय, गुरुदत्तचा अडगेपणा. जीवन चालणारं, न थांबणारं. त्यात हे असे प्रसंग नातेसंबंधात गोडवा निर्माण
करणारे. मग पडती बाजू घेतली तर काय बिघडणार हो…!