‘वंदना’ प्रकाशनाच्यानिमित्ताने

-शहाजीराव बलवंत, डॉ. बलवंत बी. एस.हिंदी विभागप्रमुख व उपप्राचार्य, दहिवडी कॉलेज, दहिवडी ता. माण, जि. सातारा
‘‘पहिली माझी ओवी गं, भगवंत बुद्धाला।
धम्म दे आम्हाला, जीवन सुंदर करण्याला॥
दुसरी माझी ओवी गं, जोतिबा फुलेंना।
जाती-पाती गाडण्याला, न बंधुभाव नांदण्याला॥
तिसरी माझी ओवी गं, सावित्रीबाई फुलेंना।
बुद्धी दे स्त्रीजातीला, शिक्षण घेण्याला॥
चौथी माझी ओवी गं, आंबेडकरसाहेबांना।
समतेने जगण्याला, घटना दिली आम्हाला॥’’
दंबरीकार शहाजीराव बलवंत यांची ‘उत्कर्ष प्रकाशन’ पुणे यांनी २९५ पृष्ठांची प्रकाशित केलेली ‘‘वंदना’’ ही त्यांची दुसरी साहित्यरचना आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सिद्धांताची थोरवी सांगणारी आणि आंतरजातीय विवाहाचे समर्थन, समाजपरिवर्तनाची कास धरणारी ही रचना आहे.
‘माणमाती’ आत्मकथनानंतर ‘भिंगरचे’ रहस्य आणि आनंद वाचक घेत असताना नव्या विचाराची माणदेशी भाषेमधील अनमोल कादंबरी शहाजीराव बलवंत यांनी ‘‘वंदना’’च्या रुपाने वाचकांच्या स्वागतासाठी आणली आहे.
कादंबरीच्या कथेची सुरुवात स्वारगेट-पुणे चार मैत्रिणींच्या माध्यमामधून सुरू होते. त्या मैत्रिणी – वंदना (भक्ती), मुक्ती (रंजना), उक्ती (भामिनी), तृप्ती (वैजयंता). वंदना आणि यशवंत ही या कादंबरीमधील दोन मुख्य पात्रे असून त्यांच्यासोबत बापूसाहेब, नामदेव, गायकवाडगुरुजी, लिगाडेगुरुजी, प्रा. चंदर, हौसा ही पात्रे सुरुवात ते शेवटपर्यंत वाचकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करतात.
‘वंदना’ नायिका माणदेशातील लोटेवाडी (बौद्धवाडा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन कादंबरीची नायिका वंदना उच्च शिक्षणासाठी पुण्याला जाते आणि जिल्हाधिकारी होऊन परत येते. ही या कादंबरीची मूळ कथा असली तरी या कादंबरीमध्ये लेखकाने समाजातील अनेक विषयांवर प्रकाश टाकला आहे. जसे दुष्काळातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःखी जीवन, शेतीला वेळेवर पुरेसा वीजपुरवठा न होणे, समाजातील व्यसनाधिनता, विधवा स्त्रियांची व्यथा, कामधंदा न करणाऱ्या मुलांच्या लग्नांची समस्या, गावगाड्याची रचना.
बौद्धवाड्यातील ‘भीम जयंती’ साजरी करण्याचे प्रकार, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची साखळी, शिक्षणक्षेत्रातील लिगाडेगुरुजींच्या माध्यमामधून घडविलेले हुजरेगिरीचे चित्रण आणि लाचारीचे दर्शन, तर दुसऱ्या बाजूला गायकवाडगुरुजींचा प्रामाणिकता आणि प्रामाणिकतेची झालेली फरफट आणि कर्जबाजारीपणा. शिक्षणक्षेत्रातील उदारीकरण आणि शिक्षणाचा बाजार, गुणवत्तेचे वाजलेले बारा यावर अचूक लेखकाने टाकलेला प्रकाश विचार करायला लावणारा आहे.
गायकवाडगुरुजींच्या निधनानंतर कादंबरीची कथा वाचकाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. ‘वंदना’ विज्ञान शाखेची पदवीधर होऊन आंबेडकर आणि कबीरांच्या विचारांचे अनुकरण करते आहे. लेखकाने नायिकेच्या माध्यमामधून समाजपरिवर्तनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस नोकरीशिवाय जगू शकतो का? याचा विचार करायला लावणारी कादंबरीची कथा आहे. कादंबरी कथेच्या मध्यानंतर प्रवासातील गमतीजमती. शिक्षकभरतीतील भ्रष्टाचार, हौसाचे आजारपण, दवाखान्यातील ढिसाळ व्यवस्थापन या गोष्टी वाचकाला बांधून ठेवण्याचे काम करतात.
थोडक्यात ‘वंदना’ कादंबरी वंदनाला टारगट मुलांच्या अत्याचारापासून मुक्त करणाऱ्या यशवंतकडे वेगळ्या विचारांनी पाहण्यासाठी भाग पाडले. वंदना आणि यशवंत यांच्यामधील आकर्षण गावातील आबंटशौकिनांसाठी चर्चेचा विषय होता. ‘वंदना’ कादंबरीमधील नायक यशवंत वंदनाला शेवटपर्यंत साथ देतो. कादंबरीची कथा राजकारणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मेजर सुभेदार सदाभाऊ आणि त्यांचे सरपंच होण्याचे स्वप्न हा एक उपकथेचा वेगळा विषय आहे.
गावामधील आंबेडकर जयंतीच्यानिमित्ताने आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी गावाकडील ग्रामस्थांचे विचार याबरोबरच आई-वडिलांशिवाय समाजामध्ये राहणाऱ्या मीना नावाच्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, खेड्यातील मनोरंजनाची साधने, नाटकाचा विषय, हेडामास्तर जोशी यांचे विचार वाचकाला खेड्यातील वातावरणाची ओळख करून देतात.
‘वंदना’ कादंबरीची नायिका प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यानंतर तिच्याकडे आकर्षित झालेला भद्रसिंग. भद्रसिंगच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दलचे कुतूहल, प्रशिक्षण समाप्तीनंतर वंदना आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे गयादर्शन, यशवंत-वंदनाची मुंबई भेट, भेटीमधील जातिबंधनापलिकडचा विचार, दलित समाजातील पहिली स्त्री कलेक्टर होण्याचा वंदनाचा सन्मान हा महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विजय आहे.
वंदनाच्या स्वागतासाठी लोटेवाडी गावातील ग्रामस्थांनी केलेली तयारी, कार्यक्रमातील प्राध्यापक चंदरचे भाषण आणि विचार कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी अभिव्यक्त केलेले विचार, ग्रामस्थांची अपेक्षा, भ्रष्टाचार, चारा छावणी, लोकप्रतिनिधीकडे घातलेले गाऱ्हाणे, वीज-चोरी प्रकरण, जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी बौद्धधर्माचे आचरण करण्याचा सल्ला इ. गोष्टींचा कादंबरीमध्ये विषय आला आहे.
कादंबरीच्या शेवटी बापूसाहेबांचे आजारपण यशवंत-वंदना यांच्या आंतरजातीय विवाहाला पती-पत्नींची मान्यता, बौद्ध, नोंदणी पद्धतीने विवाह, बापूसाहेबांचा मृत्यू, वंदनाबद्दल गावातील स्त्री-पुरुषांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे विचार, दिलीपचे दारूचे व्यसन, वंदनाबद्दल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली तिरस्काराची भावना, बापूसाहेबांच्या वर्षश्राद्धप्रसंगी निर्माण झालेली परिस्थिती, यशवंतची आई, बाईचे विचार, देवाच्या दारात लेकरं सगळी सारखीच हा विचार वाचकांना विचार करायला लावणारा आहे.
वंदना आयुक्तपदी बदली झाल्यानंतर डोहाळजेवण, बापूसाहेबांच्या समाधीजवळ घडलेला प्रसंग, वाचकाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जातो. लेखकाने या स्त्रीप्रधान कादंबरीच्या माध्यमामधून आनंद, वेदना, द्वेष, प्रेम, मानापमान हे मानवी जीवनातील कडेकंगोरे आहेत. या सर्वांवर विजय प्राप्त करणे म्हणजे बुद्धाला शरण जाणे होय. लेखकाने यानिमित्ताने यशवंत-वंदनाचा आंतरजातीय विवाह म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचा सिद्धांताचा विजय म्हणावा लागेल.
‘वंदना’ कादंबरी समकालीन समाजव्यवस्था राजकीय, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार, गुणवत्तेचे वाजलेले बारा, तळवेचाटू संस्कृती हुजरेगिरीचे दुसरे नाव, ग्रामीण भागातील जातिव्यवस्था, निसर्गवर्णन, चारा घोटाळा, टँकर घोटाळा, स्त्री-शिक्षणाचे महत्त्व, मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारी ही कादंबरी आहे.
‘वंदना’ कादंबरीची भाषा म्हणजे लेखकाच्या निरीक्षणशक्तीचा परिचय देणारी आहे. माणदेशी लेखकाच्या अंगणामध्ये फुललेल्या बागेतील शब्दसुमनांची, त्यांनी मुक्त हस्ते वाचकांच्या मनोरंजनासाठी आणि समाजपरिवर्तनासाठी प्रयुक्त केलेले शब्द, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांचा वेळोवेळी वाचकाला येणारा अनुभव भाषेची भुरळ घालणारा आहे. जसे ‘पायलीला पन्नास पुढारी, ‘हात ओला तर मैतर भला,’ खुळं म्हणा, नाहीतर भंडाऱ्याची धूळ म्हणा, सत्तीच्या बत्तीन शिंदळच्या घरी झुलती हत्ती, घर सलगी न, वाजूदे हलगी’’ ‘पुरेना सारा गाव न का घेतो, माझे नाव, हावस केली आणि गंजीत गेली, पैशांची बातच न्यारी, बुद्धी काय चालेल बिचारी, येळना ना वकुत न म्हातारी बसली खोकत, जोपर्यंत देव तोपर्यंत गुरव’, वटलेल्या डाळिंबीच्या बागा म्हणजे नवरा मेलेल्या बायका, सोलापुरी भाषेचा प्रभाव असलेले शब्द, आणलाव झालाव, सांगताव, अस्ताव अशा प्रकारच्या भाषांनी सजलेली वंदना कादंबरी आहे. माणदेशी भाषेचा तडका, पुणेरी आणि सोलापुरी भाषेवर वरचढ होताना वाचकांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही.’
समकालीन परिस्थितीचे सर्वांगीण वर्णन करणारी, सामाजिक, राजकीय, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार, ग्रामीण चित्रण या सर्वांवर भाष्य करणारी, उपमा, अलंकार, बिंब, म्हणी, वाक्यप्रचार या सर्वांची लेखकाने मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. कादंबरी शीर्षकापासून वाचकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करते व आंतरजातीय विवाह, समतेचा विचार आणि समर्थन यांबरोबरच आंबेडकरी चळवळीची पताका पुढे निश्चितपणे घेऊन जाणारी आहे. यात शंका नाही. लेखकाला ‘वंदना’ कादंबरी प्रकाशनाच्यानिमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! भविष्यामध्ये अशा प्रकारे मराठी साहित्यवर्तुळामध्ये माणदेशी साहित्यकार गदिमांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या अनेक साहित्यकृती आपल्याकडून निर्माण व्हाव्यात, ही अपेक्षा मराठी वाचकांना मनोरंजनाबरोबर विचारांची शिदोरी, अफलातून निरीक्षणशक्ती आणि संघर्ष यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ‘वंदना’ कादंबरीचा परिचय होय.
लेखक – शहाजीराव बलवंत
प्रकाशन – उत्कर्ष प्रकाशन
पृष्ठे – ३२०
किंमत – ३०० रुपये