“काळजी करू नका, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात…”, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर | Maharashtra Grampanchayat Election Result 2022 – 18 डिसेंबरला राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. तसंच आज (20 डिसेंबर) या ग्रामपंचायतींचा निकाल आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच (BJP) बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ते काल (19 डिसेंबर) पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते.
नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा विजय होईल असं म्हटलं आहे. “ग्रामपंचायत निवडणुकांचा उद्या निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भाजपच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“आम्ही मागच्या वेळेस सांगितलेलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या. त्यांनी विचारलेलं कशावरुन आल्या? आमच्या बावनकुळेंनी नावासहीत यादी घोषित केली होती. तसंच त्या ठिकाणांहून आम्ही भाजपचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत असंही सांगितलं. त्यामुळे काही काळजी करु नका, पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार,” असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
2 Comments