ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“शरद पवारांकडून विशिष्ट गुण घेण्यासारखे”, किरीट सोमय्यांचं विधान

मुंबई | Kirit Somaiya – गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज (26 डिसेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गिरीश बापट यांची रूग्णालयात भेट घेतली. यानंतर शरद पवारांकडून काही विशिष्ट गुण घेण्यासारखे आहेत, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी आणि शरद पवार यांनी गिरीश बापट यांची भेटी घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ज्याप्रकारे शरद पवार गिरीश बापट यांच्या तब्येतीची आपुलकीनं चौकशी करत होते, ते पाहून बरं वाटलं. शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान आहे. सर्वच राजकारण्यांनी पवार यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

‘आजारातून लवकर बरे व्हा, संसदेत आपण लवकरच भेटू’ असा सल्ला शरद पवार यांनी गिरीश बापटांना दिला. यासंदर्भातली माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. तसंच तुमच्या तिघांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? असं विचारलं असता सोमय्या म्हणाले, “ज्यावेळी आम्ही रुग्णालयात गेलो होते. तेव्हा बापटसाहेब पेरू खात होते. त्यामुळे आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या. शरद पवारांकडून सर्वच राजकारण्यांना विशिष्ट गुण घेण्यासारखे आहेत. त्यापैकी मी देखील काही गुण घेतले आहेत.”

पुढे ते म्हणाले, “शरद पवारांनी अनेक चांगली कामं केली आहेत. जरी आमचा पक्ष वेगळा असला तरी शरद पवार हे गिरीश बापट यांना भेटण्यास आले. हीच तर आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे,” असंही सोमय्या म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये