पुणेकरांसाठी सांगितिक, साहित्यिक मेजवानी

जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दीनिमित्त अनोखा उपक्रम
पुणे : पुण्यात जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रसिकांना सांगितिक, साहित्यिक मेजवानीचा आनंद घेता येणार आहे, अशी माहिती जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी दिली.
जी. ए. कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी आयोजित हा कार्यक्रम असणार आहे. शनिवार (८ ऑक्टोबर) संध्याकाळी 5.00 वाजता, एस.एम.जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे जी.एं.च्या आवडत्या संमिश्र संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संगीताचे अभ्यासक मुकुंद संगोराम भूषविणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर, प्रसिद्ध गायिकाअपर्णा केळकर आणि कौशिकी कलेधोणकर हे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई करणार आहेत.
रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजाता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका व समीक्षक डॉ. वीणा देव उपस्थित राहणार आहेत. यावेळी जी. एं.च्या कथेतील स्त्री व्यक्तिरेखांवर केलेल्या विशेष अभ्यासाबद्दल डॉ. वीणा देव यांचा विशेष सत्कार प्रसिद्ध लेखक आणि जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दी समितीचे सदस्य प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात जी. ए.च्या आवाजातील त्यांच्या कथा आणि मुग्धा, मनीषा या भाच्यांशी त्यांनी साधलेल्या संवादांचे एमपी-3 ऑडियो रेकॉर्डिंग स्टोरीटेलतर्फे चाहत्यांसाठी उपलब्ध होत असल्याची घोषणा प्रसाद मिरासदार करणार आहेत. जी. एं.चे विद्यार्थी सोलापूर येथील चंद्रशेखर चिकमठ हे प्रो.जी.एं.बद्दलचे त्यांचे अनुभव कथन करणार आहेत.