ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंचं व्हिडीओ शेअर करत ट्विट; म्हणाले, ‘ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट…’
अंधेरी : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा निर्विवाद विजय झाल्यानंत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी लाटकेंचं अभिनंदन केल आहे. तर विरोधकांकडून ही निवडणूक नागरिकांच्या मनासारखी झाली नसल्याचं म्हटलं जात आहे. कारण या निवडणुकीत लटके यांना ६६२४७ तर नोटा या पर्यायाला १२७७६ मतं पडली आहेत. तर दुसरीकडे भाजपने आपली मतं नोटाकडे फिरवली असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. दरम्यान, या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करत लटकेंचं अभिनंदन केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ऋतुजा लटके यांचा आज झालेला विजय हा स्वर्गीय रमेश लटके यांच्या कार्याचा आणि निष्ठेचा आहे. हा विजय शिवसैनिकांच्या जिद्दीचा शिवसेना आणि बाळासाहेबांवर असलेल्या विश्वासाचा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. या विजयाने संपूर्ण महाराष्ट्रात उर्जेची लाट पसरेल याची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ‘हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल’, ‘हीच मशाल धगधगणार संपूर्ण मुंबईभर, महाराष्ट्रभर’ अशा घोषणा असलेला व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.