दिल्ली महापालिकेत पुन्हा ‘आप’च, महापौरपदी महेश खिंची विजयी

दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रचंड गदारोळात आज निवडणूक पार पडली. या निवडणूकीत आम आदमी पक्षाने (आप) पुन्हा दिल्ली महापालिकेवर आपली पकड कायम राखली आहे. दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत आपचे नेते महेश खिंची विजयी झाले आहेत. खिंची हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत दिल्लीचे महापौर बनले आहेत. महेश खिंची यांना एकूण २६५ मते पडली. त्यापैकी २ अवैध ठरले. खिंची यांना १३३ , तर भाजपचे प्रतिस्पर्धी किशन लाल यांना १३० मते मिळाली.
विशेष म्हणजे भाजपकडे केवळ १२० मते होती. असे असतानाही भाजपला आणखी १० मते मिळाली. याचा अर्थ आपच्या दहा नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होट केले. तसेच आपकडे १४२ मते होती, ज्यात तीन राज्यसभा खासदार, १३ आमदार आणि १२६ नगरसेवकांचा समावेश आहे. ४६ वर्षीय खिंची करोलबागच्या देवनगर वॉर्डातून आपचे नगरसेवक आहेत.
पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांच्या देखरेखीखाली दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या पदासाठी मतदानाला सुरुवात झाली. महापौर झाल्यानंतर महेश खिंची म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने दिल्लीतील जनतेसाठी काम केले. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी काम करण्याला माझे प्राधान्य असेल. आम्ही दिल्लीतील लोकांसाठी काम करू, असे त्यांनी सांगितले.