ताज्या बातम्यामहाराष्ट्र

 काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले

तुम्हाला मला काय शिवीगाळ करायची ती करा, मला भोकं पडत नाही. पण योजनेबाबत बोलून करोडो कुटूंबाचे स्वप्न राख रांगोळी करू नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) टीका करणाऱ्या विरोधकांवर हल्लाबोल केला. आज सिन्नरमध्ये (Sinnar)विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्त आयोजित मेळाव्यातून ते बोलत होते.   

अजित पवार म्हणाले की, आम्ही बोलेल तसे चालणारे कार्यकर्ते आहेत. ९६० कोटींचा लासलगाव ते इगतपुरी या १६० किलोमीटराच्या रस्त्याचे भूमिपूजन केले. मी प्रत्येकाला सांगितले की, दीडशे ते २०० कोटीचे काम आणा. या एका पठ्ठ्याने ९४० कोटीचे काम आणले. लोकसभेत जे घडले तेव्हा मी सांगून दमलो. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणी माईचा लाल बदलू शकत नाही हे मी सांगत होतो. कांद्याची निर्यात बंदी केली, भाव घसरले. कोणी कांदे फेकून मारले, माळा घातल्या. आम्ही अमित शाह यांना सांगितले. त्यांना ग्राहक आणि उत्पादक दोघांचा विचार करावा लागतो. आता कांदा, टोमॅटोचे भाव बरे आहेत की नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आम्ही जनतेच्या सेवेसाठी सरकारमध्ये गेलोय

ते पुढे म्हणाले की, विमा कंपनी खूप त्रास देतात हे मी शिवराज सिंग चौहान यांना सांगितले. उद्या विजयादशमी आहे. येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे जावे, याची सप्तश्रृंगी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. पावसाचे पाणी समुद्राला वाहून जाते ते वळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.  निधीसाठी केंद्रात जे सरकार आहे. त्याच्याच विचाराचे सरकार म्हणजे महायुतीचे सरकार राज्यात आले पाहिजे. आज एक लाख कोटीचे कामे आहेत. कालांतराने ५ लाख कोटीचे होतात. त्यामुळे कर्ज घेऊन काम करतोय. आमच्या सर्व आमदारांचे 1 वर्ष कोरोनामध्ये गेलो. त्यांनतर एक वर्ष विरोधात बसलो. आम्ही लाभासाठी सरकारमध्ये गेलो नाही तर जनतेच्या सेवेसाठी सरकारमध्ये गेलो आहे, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. 

मी शब्दाचा पक्का

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार म्हणाले की, माझ्या माय माऊलींनी भरभरून सभांना गर्दी केली. या दादाला हजारो राख्या बांधल्या. हे मी कधीही विसरू शकणार नाही. तुम्हाला लाभ आणि लाभातून बळ देणार आहोत. मी जोपर्यंत आहे तो पर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. मी शब्दाचा पक्का आहे. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. तरीही विरोधक भ्रम पसरवित आहेत. चुनवी जुमला आहे असे म्हटले, पण पैसे येत आहेत की नाही? पैसे परत घेतील असे विरोधक म्हणत होते. माय माऊली आणि बहिणींना रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी कोणी मागे घेतो का रे? भाऊबीजेला देणार होतो. पण, कोणी म्हटले असते आचारसंहिता असताना देताय म्हणून आधीच पैसे दिले आहे. यालाही धमक असावी लागते, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही

अजित पवार पुढे म्हणाले की, बस तिकिटात महिलांना 50 टक्के सूट आहे. त्यांना जाऊद्या, पुरूष गेला की गप्पा मारत बसतो. याला तिकीट मिळेल का? हरियाणात काय झाले? तुम्हाला काय करायचे आहे. तुमचा प्रपंच बघा. जो गप्पा मारतो, त्याच्या शेतात काँग्रेस आणि गाजर गवत वाढलेले दिसते, अशी टोलेबाजी त्यांनी यावेळी केली.  विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. महायुतीचे सरकार आले की पुन्हा 5 वर्ष योजना सुरू करणार आहोत. विरोधकांना संधीच द्यायची नाही, तुम्ही कोणते बटन दाबणार यावर तुमची योजना चालू राहणार की नाही हे ठरणार आहे. मला बदनाम करणायचे काम सुरू आहे. मी त्याला उत्तरं देत नाही. विरोधकांना हात जोडून विनंती आहे की, तुम्हाला मला काय शिवीगाळ करायची ती करा, मला भोकं पडत नाही. पण योजनेबाबत बोलून करोडो कुटूंबाचे स्वप्न राख रांगोळी करू नका, असे हल्लाबोल त्यांनी यावेळी विरोधकांवर केला. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये