ठरलं! अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच, अजित पवार गटासमोर भाजप हायकमांडची शरणागती?

मुंबई : (Ajit Pawar On Amit shah) खातेवाटपावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच आता मात्र खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar), प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यात बुधवारी दि.12 जुलै रोजी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप (BJP) हायकमांड मुख्यमंत्री शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार गटाकडून खाते वाटपाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत झालं असून तिनही पक्षांच्या सहमतीनं अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तिनही पक्षांमध्ये सहमती झाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. सत्तेची सगळी समीकरणंच बदलली. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली. अजित पवारांच्या निर्णयानं विरोधकांच्या तोंडचं पाणी पळालंच, पण भाजपसोबत आधीपासूनच सत्तेत बसलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची आणि मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या आमदारांचीही झोप उडाली. अजित पवारांसोबत 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीला आठवड्याहून अधिक काळ उलटला तरिदेखील अद्याप त्यांचा खातेवाटप झालेला नाही.
शिंदे गटातील मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या सर्व आमदारांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता थेट दिल्लीतील भाजप हायकंमांडच यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. आता भाजप हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर तरी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.