“रवी राणांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज…”, अमोल मिटकरींचा टोला

मुंबई | Amol Mitkari On Ravi Rana – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट या दिवशी पार पडला. यावेळी एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये अपक्ष आमदार रवी राणा हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचं पहायला मिळालं. याच संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर खोचक शब्दात टोला लगावला आहे.
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठनाच्या मुद्द्यावरून जोरदार मोहीम उघडली होती. अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हनुमान चालीसा पठन करण्याचा देखील त्यांनी घाट घातला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमवीर रवी राणा यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला. यावर आता अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे.
“हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने “देवेंद्र चालीसा” वाचण्याची गरज आहे. रवी राणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.