आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्ताने शिंदे-ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता

मुंबई | शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांची जयंती आहे. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त (Anand Dighe Birth Anniversary) टेंभी नाका येथे आनंद आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच जयंतीच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे.
आनंद दिघे जयंतीच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये (Thane) आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर ते आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंना आदरांजली वाहतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र उद्धव ठाकरेंकडून असे काहीही झाले नाही, त्यामुळे शिंदे गटासहीत ठाण्यातील काही कडवट शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आज आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रम येथे ठाकरे गटाचे नेते अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. आता शिंदे गट त्यावर काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आज आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह कॅबिनेट मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि इतर नेते हे आनंद आश्रमात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र शिंदे गटाकडून त्यांचा विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.