ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

‘डॅमेज कंट्रोल’ करत धीरज घाटेंची शहराध्यक्षपदी नियुक्ती

पुणे | भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये शंकर जगताप यांना संधी देत जगताप गटाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या निवडीमधून बहुभाषिक ब्राह्मण समाज आणि मराठा समाजाला न्याय देत समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केलेला दिसतो. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाने जातींचा समतोल राखण्याचा प्रयत्न या नेमणुकीतून केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत बावनकुळे यांची निवड झाली, तेव्हा शहर संघटनेत बदल होतील, असे अपेक्षित होते. त्याप्रमाणे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांना बदलून घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी काळात महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. या महत्त्वाच्या काळात संघटक वृत्तीच्या घाटे यांच्याकडे पक्षाने शहराची धुरा सोपविली आहे. कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशी घाटे यांची ओळख असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. लोकमान्य नगर, अंबिल ओढा कॉलनी या प्रभागातून २०१७ साली ते पुणे महापालिकेवर निवडून आले होते. नगरसेवक पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये सभागृह नेता या पदावरही त्यांना नेमण्यात आले होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला गृहित धरून भाजपने रणनीती आखली होती, त्याचा फटका निवडणुकीत बसला, भाजपला हक्काची जागा गमवावी लागली. या पराभवाची आणि त्यामागील कारणांची दखल भाजपला घ्यावी लागली. डॅमेज कंट्रोलचा एक भाग म्हणून कसबा मतदारसंघातील धीरज घाटे या तडफदार कार्यकर्त्याला शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.

भाजपमध्ये ब्राह्मण समाजातील अनेक नेते तयार झाले. रामभाऊ म्हाळगी, अण्णा जोशी, अरविंद लेले, गिरीश बापट यांची नांवे यात घेता येतील. यापैकी म्हाळगी, जोशी आणि बापट खासदार झाले. बापट यांच्या निधनानंतर ब्राह्मण लीडरशिपची उणीव पक्षात निर्माण झाली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी ब्राह्मण समाजात नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. ब्राह्मण समाजाला भाजपमध्ये डावलले जाते, अशी भावना तेव्हापासून निर्माण झाली. कसब्यातही उमेदवारी डावलल्याने ब्राह्मण समाज निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिला. मराठा समाजाला पश्चिम महाराष्ट्रात भाजपने झुकते माप दिले आहे, मात्र बहुभाषिक ब्राह्मण वर्ग मोठया संख्येने पुणे शहरात असल्याने या वर्गाला सतत डावलत रहाणे परवडणारे नाही, असे भाजप नेतृत्वाला जाणवले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ब्राह्मणेतर समाजाला उमेदवारीत भाजप प्राधान्य देणार आहे. याकरिता संघटनेत अध्यक्षपद देऊन ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समतोल राखण्याचा प्रयत्न घाटे यांच्या नियुक्तीतून भाजपने साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये