ताज्या बातम्यारणधुमाळी

“इतका छळवाद झाला तेव्हा राजसाहेब गप्प होते आता…”, अरविंद सावंतांचं सूचक विधान!

मुंबई | Arvind Sawant On Raj Thackeray – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गट-भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला ही निवडणूक न लढण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या भूमिकेवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजप माणुसकीहीन, संवेदनाहीन, संस्कृतीहीन पक्ष आहे…! इतका छळवाद झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते. आता फाॅर्म भरून झाला आहे, भूमिका व्यक्त करण्यास उशीर परंतु एक संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल आभार…!”, असं अरविंद सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

अरविंद सावंत यांनी ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, “ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण उशीर झाला आहे. देर आए दुरूस्त आए असं म्हणता येईल, ते त्यांच्या व्यक्तीपुरतं म्हणता येईल. पण प्रत्यक्षात काय घडलं? निवडणूक आयोगाकडे जेव्हा शिवसेना नाव आणि चिन्हाच्या संदर्भात वाद घातला तेव्हा या शिंदे गटानं काय म्हटलं की धनुष्यबाणाचा गैरवापर होईल आणि म्हणून ते गोठवावं. ते चिन्ह गोठवावं, आम्हाला द्यावं किंवा नाव गोठवावं पण ते निवडणूक लढत आहेत का? खोटेपणा तिथे केला, किती खोटारडी माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येक नेत्यांचं विधान हे कायम खोटं असणार आणि होतं. त्यांचं हे सरळसरळ समोर दिसलेलं, अनुभवलेलं उदाहरण आहे.”

पुढे अरविंद सावंत म्हणाले, “एवढं करून ते थांबले का? ते थांबले नाही. तर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजुर करताना जे गलिच्छ राजकारण खेळलं गेलं, जो दबाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टाकला, त्यांनी कितीही जरी सांगितलं, की आमचा दबाव नव्हता. तर मी उलट प्रश्न विचारतो की मग राजीनामा मंजुर करण्याचे आदेश का नाही दिले? तुमचा दबाव होताच होता. दुर्दैवानं अधिकारी गुलामासारखे वागले. त्यांनी मुंबई महापालिकेला कलंक लावला, लांच्छन लावलं. उतका छळवाद जेव्हा झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते आणि आता त्यांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा अर्ज वैगरे भरून झालेला आहे. प्रचाराला सुरूवात झालेली आहे. कदाचित लक्षात आलं असेल की पराभव होईल, म्हणून त्यांनीच यांना नाही ना सांगितलं की तुम्ही असं एक पत्र द्या आम्हाला. आम्हाला थेट माघार घेता येणार नाही. मग राज ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतली असं दाखवायचं असेल. ही पळवाट आहे, पण दुर्दैव आहे.”

“राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या या राजकारणात स्वत:ला गुंतवून घेऊ नये असं मला वाटतं. कारण, यांनी (भाजप) माणुसकू सोडलेली आहे. ही संवेदनाहीन माणसं आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काय घडलं हे तुम्ही बघा. जयश्री जाधव जेव्हा उभ्या राहिल्या ती जागा शिवसेनेची होती. शिवसेनेनं दिलदारपणे सांगितलं की आमचा पराभव झाला होता, पण आम्ही हट्ट नाही केला. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते भाजपचा पराभव झाला तर मी हिमालयात जाईन. तेव्हा सुद्धा त्यांनी माणुसकी दाखवली नाही. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते भाजपचा पराभव झाला तर मी हिमालयात जाईन. तेव्हा सुद्धा त्यांनी माणुसकी दाखवली नाही. हे लोक काय माणुसकी दाखवणार. आता कळू द्या ना हिंदू. खरंतर त्यांनी हिंदूत्व हा शब्द देखील वापरू नये. माणुसकीहीन, संवेदनाहीन, संस्कृतीहीन असा तो(भाजप) पक्ष आहे. म्हणून कृतज्ञता हा शब्द त्यांच्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यांनी जी काय भूमिका घेतली असेल, तर फार उशीर झालेला आहे. पण एक संवेदना दाखवली त्याबद्दल आभार आहे”, असंही अरविंद सावंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये